प्रतिनिधी /मडगाव
गेल्या काही वर्षांमध्ये मडगाव शहर खूप बदलले आहे. आपण भूतकाळातील जे काही ऐकतो आणि आपण जे प्रत्यक्ष पाहिले आहे त्यावरून असे दिसते की, मडगाव हे मोठय़ा प्रमाणात लोकवस्तीचे ठिकाण बनले आहे आणि राज्याची व्यापारी राजधानी म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. शहर म्हणून मडगावला 244 वर्षे पूर्ण झाली आहेत.
या शहराच्या विकासातील सर्वांत सकारात्मक पैलू 1900 च्या सुरुवातीच्या काळात दिसून येतो. यावेळी ’काम्रा दि सालसेत’ ही इमारत म्हणजे मडगाव पालिकेची इमारत सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. बैलगाडय़ा, सायकली आणि मोजक्मया मोटारगाडय़ांच्या वेळी नियोजन केलेले रस्त्यांचे जाळे शेकडो वर्षांपूर्वीचे असले, तरी आजही वाहनांच्या संख्येला पूरक आहे. अनेक रस्त्यांची रूंदी वाढली, तरी अतिक्रमणांमुळे ती कमी झाली आहे. त्यामुळे त्या काळातील योजनाकारांचे नक्कीच कौतुक करावे लागेल.
आज त्याच्या विपरित 35 वर्षांपूर्वीचा नियोजित रिंग रोड अद्याप पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहे. 2015 मध्ये संकल्पित बहुस्तरीय पार्किंग सुविधेचे बांधकाम आजपर्यंत सुरू होऊ शकलेले नाही. या शहराचे एकमेव सौंदर्य, जे उत्कृष्ट स्वरूप आणि ‘वारसा लूक’ जोडते, ते म्हणजे कोंब-आबे फारिया रोड परिसर, होली स्पिरीट चर्च-बोर्डा परिसर आहे. सरकारचा कोणताही पाठिंबा नसताना घरे इतक्मया चांगल्या प्रकारे सांभाळण्याचे सर्व श्रेय मडगावच्या या पुरातन घरांच्या मालकांनाच जाते. तथापि, जुने मार्केट येथील जुनी म्युनिसिपल बिल्डिंग आणि डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे वडिलोपार्जित घर जतन करण्याचे आमचे 13 वर्षांचे स्वप्न दुर्दैवाने स्वप्नच राहिले आहे, असे शॅडो कौन्सिल फॉर मडगावने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या शहराचा चिंतेचा विषय म्हणजे झपाटय़ाने वाढत असलेल्या झोपडपट्टय़ा हा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.