अधिकाधिक मताधिक्क्याने निवडून देण्याचा निर्धार : तळागाळापर्यंत प्रचार केल्यास शुभम शेळके यांचा विजय नक्की
प्रतिनिधी / बेळगाव
मराठी भाषिकांना न्याय हा म. ए. समितीच देऊ शकते. राष्ट्रीय पक्ष केवळ मतदार म्हणून मराठी भाषिकांचा वापर करून घेत आहेत. यामुळे वारंवार त्यांच्यावर या ना त्या कारणाने अन्याय करण्याचा प्रयत्न केला जातो. या अन्यायाला वाचा फोडून आपला आवाज दिल्लीत पोहचविण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना मोठय़ा मताधिक्क्मयाने निवडून देण्याचा निर्धार शहर म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
शुक्रवारी शहर म. ए. समितीची व्यापक बैठक जत्तीमठ येथे पार पडली. या बैठकीत शुभम शेळके यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक नेताजी जाधव होते. यावेळी सरचिटणीस किरण गावडे म्हणाले, बेळगावमध्ये अनेक मराठी संस्था आहेत. त्यांच्यामधील संचालक, आजी-माजी लोकप्रतिधिनी यांनी जर तळागाळापर्यंत प्रचार केल्यास आपला विजय नक्की आहे. परंतु काही जणांच्या पाकीट संस्कृतीमुळे आपला घात होत आहे. त्यामुळे असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
नेताजी जाधव म्हणाले, शुभम शेळके यांना उमेदवारी जाहीर झाल्याने तरुणांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांच्या आहारी गेलेला युवक पुन्हा समितीच्या भगव्या ध्वजाखाली येत असल्याचे सांगितले. मराठी भाषिकांची मते विखुरली जात आहेत ती एकत्रित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन चंद्रकांत गुंडकल यांनी केले. यावेळी माजी महापौर सरिता पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, नारायण किटवाडकर, शिवाजी हंडे, शेतकरी संघटनेचे नारायण सावंत, सुहास किल्लेकर, रवी साळुंखे, किरण बडवाण्णाचे, सतीश गावडोजी, अंकुश केसरकर, राजू पाटील, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.