प्रतिनिधी/ खेड
विरोधकांकडे विकासाचे व्हिजन नसून शिवसेना व युवासेनेच्या भगव्या वादळात विरोधक भरकटले आहेत. यामुळे विरोधकांचा खोटय़ा क्लिपांद्वारे राजकीय पोळी भाजून घेण्याचा खटाटोप कदापिही यशस्वी होणार नाही, असे ठणकावत शहर विकासासाठी येत्या आठ दिवसांत 5 कोटींचा निधी देण्याची ग्वाही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
शहरात आयोजित सेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत आमदार योगेश कदम यांच्या कणखर नेतृत्वाचे कौतुकही केले. ते म्हणाले, माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना नाहक बदनाम करून राजकीय पोळी भाजून घेण्याचे षडयंत्र विरोधकांकडून रचले जात आहेत. मात्र त्यांचे कुटील डाव कदापिही यशस्वी होणार नाहीत. विरोधकांची अनेक प्रकरणे आपल्या हातात असून लवकरच त्यांचा भांडाफोड करणार असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले. येत्या नगरपरिषदेसह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपापसातील मतभेद बाजुला सारून भगवा डौलाने फडकवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार योगेश कदम यांनीही निवडणुका जवळ आल्यावर विरोधकांची सोंगे आपसुकच बाहेर येतात असे सांगून माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यावर आरोप करणाऱयांची आजची स्थिती काय आहे, हे जनतेला चांगलेच ज्ञात असल्याने युवासेनेच्या भगव्या वादळाने विरोधकांना उत्तर मिळाले असल्याचे सांगितले.
यावेळी तालुक्यातील कुळवंडीसह अन्य गावांतील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, तालुकाप्रमुख विजय जाधव, पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे, उपसभापती जीवन आंब्रे, माजी नगराध्यक्षा वैशाली कवळे, माजी नगरसेवक संजय मोदी, शहरप्रमुख निकेतन पाटणे, सुप्रिया पवार, महेश भोसले, सचिन धाडवे, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, सुदेश उसरे, विजय कदम, मिनार चिखले, स्वप्नील सैतवडेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय मोदी यांनी केले.