सातारा : शहापूर पाणीपुरवठा योजनेमध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या फ्लॅक्युलेटरची यंत्रणा दुरुस्त करण्यात यश आले आहे. त्यामुळे या योजनेमध्ये पावसाळ्यामध्ये कितीही गढूळ पाणी फिटर टँक मध्ये आले तरी पूर्णक्षमतेने तुरटीचा वापर करून शहरास स्वच्छ पाणी पुरवठा उपलब्ध होणारअसल्याची माहिती सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा सभापती सीता राम हादगे यांनी दिली.
हादगे म्हणाल्या, शहापूर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून सातारा शहराच्या पूर्व भागासह अन्य भागात सुमारे साडेसात एमएलटी म्हणजेच 60 टक्के पाणीपुरवठा करण्यात येतो. या योजनेमध्ये फिल्टर बेडला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामध्ये फ्लॅक्युलेटर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, सुमारे वर्षभरापूर्वी त्यातील एक पार्ट निकामी झाला होता. गेल्या दीड वर्षापासून सतत सुरू असणारा लॉकडाउन यामुळे संबंधित पार्ट उपलब्ध होण्यास अनंत अडचणी येत होत्या. परिणामी या योजनेसाठी अधिकचे मनुष्यबळ लागत होते. पुणे येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी आल्यामुळे तेथील बहुतांश दुकाने खुली करण्यात आले आहेत. ही बाब लक्षात घेता पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित पार्ट कोठे उपलब्ध होतो याची माहिती घेऊन तो तात्काळ उपलब्ध करून घेतला. त्यामुळे चार दिवसापूर्वीच शहापूर पाणीपुरवठा योजनेतील फ्लॅक्युलेटरच्या यंत्रातील बिघाड दूर होऊन ती पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. त्यामुळे या योजनेत मनुष्यबळ कमी लागण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
15 दिवसांपूर्वीच शहापूर पाणीपुरवठा योजनेतील फिल्टरेशन टँकची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे. गाळ ढकलणाऱ्या पुलाचे ऑईलिग, सर्व्हिसिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. टँकमध्ये आवश्यक तेवढी तुरटी टाकण्यात आली असून, त्यामुळे शहापुर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून 50 टक्के अधिक सातारकर नागरिकांना आता पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा राहिला नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.