प्रतिनिधी / बेळगाव
शहापूर येथील केएलईच्या बी. एम. कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालयातर्फे पदवीप्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 9 रोजी केएलई येथील डॉ. बी. एस. जिरगे सेंच्युरी हॉल येथे सकाळी 10.30 पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कंकणवाडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहासकुमार शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून पदवीप्रदान कार्यक्रम करणे अशक्मय झाले होते. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. मात्र यावर्षी हा कार्यक्रम होणार असून यामध्ये बीएएमएस आणि एमडी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व पदवी प्रदानचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला भारतीय चिकित्साबदल, राष्ट्रीय आयोग आयुष मंत्रालयचे अध्यक्ष बी. श्रीनिवास प्रसाद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
शहापूर येथील कंकणवाडी महाविद्यालयामधून 2016 ते 2018 मध्ये एमडी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना तसेच 2013-15 मधील बीएएमएस पदवी घेतलेल्या 210 विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. केएलई विश्व महाविद्यालय, केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुहासकुमार शेट्टी, प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू विवेक सावजी, डॉ. राकेश शर्मा, केएलई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले, डॉ. प्रशांत जाडर हे उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला डॉ. किर्तन एम., डॉ. के. एस. संगोळ्ळी, डॉ. कादंबरी एस., डॉ. हेमलता बी. यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.