मुलांचा सहभाग लक्षणीय, खासबाग येथे विविधरंगी फुलांची उधळण
प्रतिनिधी / बेळगाव
होळीनंतर पाच दिवसांनी साजऱया झालेल्या शहापूर, वडगाव, खासबागच्या रंगपंचमीमध्ये विविध रंगी फुलांची उधळण करण्यात आली. त्यामुळे ही रंगपंचमी वैशिष्टय़पूर्ण ठरली. दरम्यान या सर्व परिसरात झालेल्या रंगपंचमीमध्ये बालचमूबरोबर महिला व पुरूषांनी सुद्धा मोठय़ा उत्साहाने सहभागी होत रंगोत्सवाचा आनंद लुटला.
शहापूर, वडगाव व खासबाग परिसरात होळीनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. रंगपंचमीसाठी बालचमूनी दोन दिवसापासून रंग आणि पिचकाऱयांची जमवाजमव सुरू केली होती. शहापूर बाजारपेठ या साहित्याने आणि रंगाने सजली होती. शहरात दोनवेळा रंगपंचमी साजरी होत असल्याने तरूणाई त्याचा पुरेपूर लाभ घेते. त्यामुळे टिळकवाडी, अनगोळ, शहराचा मध्यवर्ती भाग, उपनगरे येथे होळीच्या दुसऱया दिवशी रंगपंचमी साजरी होते. परिणामी दुसऱया दिवशी या भागामध्ये आणि पाचव्या दिवशी शहापूर वडगावमध्ये जाऊन रंग खेळण्याचा आनंद तरूणाई पुरेपूर घेते.
यंदा शहापूरची रंगपंचमी शुक्रवारी आली. विशेष म्हणजे हा दिवस ‘गुडफ्रायडेचा’ असल्याने शाळांना सुटी मिळाली. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी उठविला. आणि रंगांच्या उधळणीमध्ये विद्यार्थी न्हाऊन निघाले. पिचकाऱयांनी रंग उडविणे, त्याचबरोबर चेहऱयाला रंग लावणे, आणि फुगे मारणे असे प्रकार सर्वत्र सुरू होते.
प्रशासनाने डॉल्बिसाठी परवानगी दिली नाही. मात्र तरूणाई आणि बालचमु मोबाईलवर गाणी लावून ठेका धरून नृत्य करत असल्याचे पहायला मिळाले. साधारण 12 वा. रंगपंचमीची वेळ संपते. तथापी शुक्रवारी सुटीचे कारण पुढे करत सर्वांनीच 2 वाजले तरी रंगाचा आनंद घेतला.
लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. केवळ मोठय़ांनाच नव्हे तर लहानांना सुद्धा याची कल्पना आहे. त्यामुळे यंदाच्या रंगपंचमीसाठी गाडेमार्ग येथील लहान मुलांनी आपल्या गुल्लकमधील पैसे बाहेर काढले आणि त्यातुन रंग आणुन रंगपंचमी साजरी केली. विशेष म्हणजे बसवाणगल्ली शहापूर येथे दिव्यांग मुलांनी सुद्धा सहभाग घेतला. त्यांच्या मित्र मैत्रिणिनी त्यांची सर्वतोपरि काळजी घेत त्यांना रंगोत्सवात सहभागी करून घेतले.