इचलकरंजी / प्रतिनिधी
चार हजार रूपयांची लाच घेताना शहापूर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईकला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले. पांडूरंग लक्ष्मण गुरव ( वय २७, मूळ रा. पिरळ, ता. राधानगरी, सध्या रा. हळदकर बंगला, गोंजारी हॉस्पिटलशेजारी, खानापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) त्यांचे नाव आहे. ही कारवाई कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबध विभागाचे पोलीस उपाअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी केली .
याबाबतची अधिक माहिती अशी, तक्रारदार व त्यांच्या आई विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक पांडूरंग लक्ष्मण गुरव करीत आहे. या गुन्ह्याच्या तपासात मदत करणेसाठी पोलीस नाईक गुरव यांने ४ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. याविषयी तक्रारदाराने लाच लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. याची दखल घेवून लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यानी पडताळणी केली. पडताळणीमध्ये त्याने ४ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन गुरुवारी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबध विभागाचे पोलीस उपाअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश मोरे, सहाय्यक फौजदार संजीव बंबरगेकर, पोलिस हावलदार अजय चव्हाण, पोलिस नाईक विकास माने, सुनिल घोसाळकर, नवनाथ कदम, कॉन्स्टेबल मयूर देसाई आदीच्या पथकाने सापळा रचला. या सापळ्यावेळी पोलीस नाईक गुरव याला ४ हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.