२ लाख ३० हजार ७३० रुपये किंमतीचा गुटख्याचा अवैध साठा आणि तंबाखू जन्य पदार्थ जप्त
प्रतिनिधी / इचलकरंजी
शहापूर येथील गणेशनगरातील रुक्मिणी ट्रेडर्स या किराणा दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. २ लाख ३० हजार ७३० रुपये किंमतीचा विविध कंपनीचा गुटखा, मान मसाला, सुंगधी सुपारी, तंबाखू जन्य पदार्थ असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दुकान मालक सचिन विलास गवड (वय ३२) याला अटक करीत पोलिसांनी त्याचे किराणा दुकान सिल केले आहे. ही कारवाई सोमवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.
गणेशनगरातील गल्ली नंबर ५ मध्ये संशयित आरोपी सचिन गरड याचे रुक्मिणी नावाचे किराणा दुकान आहे. तो दुकानामध्ये गुटख्याचा अवैध साठा करुन त्यांची विक्री करीत असल्याची माहिती शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश निकम यांना बातमीदाराकडून समजली. त्यांनी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांना गरड यांच्या किराणा दुकानावर छापा टाकून कारवाई करण्याबाबतचा आदेश दिला. त्यावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव, सहाय्यक फौजदार सुरेश कोरवी, कॉन्स्टेबल अविनाश कांबळे, रवी महाजन, अर्जुन फतले, प्रतिराज भोपळे आदीच्या पथकाने गरडच्या दुकानावर सोमवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला त्यावेळी संशयीत आरोपी गरड हा अवैधपणे गुटख्याची विक्री करताना मिळून आला. त्यावरून त्याला ताब्यात घेवून त्याच्या दुकानाची झडती घेण्यात आली. त्यावेळी दुकानात २ लाख ३० हजार ७३० रुपये किंमतीचा विविध कंपनीचा गुटखा, मान मसाला, सुंगधी सुपारी, तंबाखू जन्य पदार्थ असा मुद्देमाल मिळून आला तो जप्त करीत गरडला अदक केली.
या कारवाईची माहिती त्वरित कोल्हापूर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यावरून या विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी विजय उनवणे यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. गरड यांच्या किराणा दुकानातील सर्व गुटखा पान मसाला, सुंगधी तंबाबू तंबाबू जन्य पदार्थ जप्त करीत त्याचे किराणा दुकान शिल केले. या कारवाई माहिती समजताच ती पाहण्यासाठी गणेशनगरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.