पतीसह सासरच्या मंडळीविरुध्द एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
आळवण गल्ली-शहापूर येथे एका नवविवाहितेचा खून झाला आहे. शुक्रवारी रात्री खुनाचा हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी तिचा पती, सासू, ननंद व दीर या चौघा जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ज्योती लक्ष्मीकांत यल्लारी (वय 19) असे त्या दुर्दैवी नवविवाहितेचे नाव आहे. शुक्रवारी रात्री आळवण गल्ली-शहापूर येथील भाडय़ाच्या घरात ज्योतीचा मृतदेह आढळून आला आहे. गळा आवळून तिचा खून केला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती समजताच शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करुन त्या विवाहितेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांनीही सिव्हिल हॉस्पिटलला भेट देवून या घटनेसंबंधीची माहिती घेतली.
ज्योतीचे कुटुंबिय मुळचे निपाणीचे. तीची आई भाजी विक्री करते. सध्या बेळगाव येथील बसवाण गल्ली येथे आईचे वास्तव्य आहे. ज्योती व लक्ष्मीकांत यांचा आंतरजातीय विवाह झाला आहे. लक्ष्मीकांत हा मुळचा मुचंडी (ता. बेळगाव) येथील राहणारा आहे. 1 मार्च 2021 रोजी शाहूनगर येथील गणेश मंदिरात कुटुंबियांनी ज्योती व लक्ष्मीकांत यांचा विवाह केला होता. त्यानंतर 5 मार्च रोजी या विवाहाची नोंदणीही करण्यात आली आहे.
लग्नानंतर सासरी गेलेल्या ज्योतीचा छळ करण्यात येत होता. तिला जातीवाचक शिवीगाळ करण्यात येत होती. त्यामुळे ज्योती व पती लक्ष्मीकांत हे दोघे आळवण गल्ली-शहापूर येथे भाडय़ाच्या घरात राहत होते. शुक्रवारी सकाळी 9.30 ते रात्री 8.40 यावेळेत तीचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे माहेरवासीयांनी फिर्यादीत म्हटले आहे.
भा.दं.वि. 498 (ए), 302, 504 सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्योतीची आई लक्ष्मी राजू पोळ यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.