वार्ताहर / बागणी
जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील झेनपुरा येथे १९ रोजी आतंकवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत वाळवा तालुक्यातील शिगाव येथील रोमित तानाजी चव्हाण, वय वर्षे २३ यांना वीरमरण आले. हुतात्मा रोमित चव्हाण यांचे पार्थिव पुणे येथून इस्लामपूर येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवार दिनांक २१ रोजी सकाळी सात वाजता त्यांच्या मूळ गावी शिगाव येथे आणण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी ८:३० ते ९ च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शहीद जवान रोमित चव्हाण अंत्ययात्रा कार्यक्रम पुढील प्रमाणे नियोजीत केली आहे.सोमवार २१ रोजी शहीद जवान यांचे घरी सकाळी सात वाजता पार्थिव कुटुंबाच्या दर्शनासाठी.साडेसात वाजता शहीद जवान यांचे घरापासून अंत्ययात्रेस सुरुवात. ग्रामपंचायत मार्गे – छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठ येथे नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी वेळ ७:३० ते ८ वा. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठ येथून महादेव मंदिर मार्गे शिवतेज चौक ते नदीकडे. शहीद जवान यांची अंत्ययात्रा वारणा नदी काठी मुख्य स्थळी सकाळी ८ ते ८:३० दरम्यान जाईल. मुख्य कार्यक्रम स्थळी
आर्मी प्रोटोकॉल व रीतीरिवाज प्रमाणे अंत्यविधी पार पाडण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम होईल. सुरवातीस लोकप्रतिनिधी त्यानंतर प्रशासकीय अधिकारी त्यानंतर आर्मी जवान पुष्पचक्र अर्पण करतील. त्यानंतर मानवंदना देण्यात येईल व नंतर मुखाग्नी देण्यात येणार आहे. बाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था- आष्टा मार्गे येणारी सर्व दोन व चार चाकी वाहने दानशूर बाळकृष्ण काका पाटील, बारवडे हायस्कूल, जिल्हा परिषद मराठी शाळा याठिकाणी करण्यात आलेली आहे. तर कोल्हापूर मार्गे येणारी वाहने भादोले हद्दीतील वारणा नदीकाठी. करण्यात येणार आहेत व ढवळी फारणेवाडी मार्गे येणारी वाहने नाईकबा मंदिराजवळ पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली.