उंबरवाडीत सैन्यदलाच्या पश्चिम कमानकडून वीरपत्नीला ‘सेना मेडल’साठी आमंत्रण
महागाव प्रतिनिधी
आपल्या भारत देशातील सैन्यदल खूप मोठे व मजबुत आहे व त्यांचे महत्त्वही अनन्य साधारण आहे. सीमेवर जवान रात्रंदिवस आपल्या मातृभूमीचे रक्षण करतात म्हणून आपण सुरक्षित आहोत. शहीद जवानांचे बलिदान आपल्याला विसरून चालणार नाही. तर त्या बलिदानातून तरुणांनी प्रेरणा घेतली पाहिजे व देश संरक्षणासाठी पुढे आले पाहिजे. असे मत गडहिंग्लज तालुक्याचे तहसीलदार दिनेश पारगे यांनी व्यक्त केले. ते उंबरवाडी येथील शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्या सेना मेडल आमंत्रण कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती वरून बोलत होते. या वेळी वीरपिता गणपती चौगुले, वीरपत्नी यशोदा चौगुले, पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे उपस्थित होते.
जम्मू-काश्मीरमधील फॉरवर्ड पोस्ट ठिकाणी शत्रूशी झालेल्या चकमकीत शहीद जवान जोतिबा चौगुले शहीद झाले. त्यांनी दाखविलेल्या वीरता, साहशी आणि कर्तव्याबद्दल भारतीय सैन्य दलाच्या पश्चिम कमानद्वारे सेना मेडल जाहीर करण्यात आले आहे. सदरचा कार्यक्रम पंजाब राज्यातील मामून मिलिट्री स्टेशन येथे ४ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे.त्यांचे निमंत्रण देण्यासाठी पश्चिम कमानचे अधिकारी आले होते.
प्रारंभी भारतीय सेनादल,तहसीलदार दिनेश पारगे , पो.उपनिरीक्षक समाधान घुगे, यांच्याकडून शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण केले.त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.शिवसहकार सेनेचे तालुका संघटक आखलाकभाई मुजावर,पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी मनोगत व्यक्त केले.पश्चिम कमांचे अधिकारी नाईक सुभेदार सचिन येवले याने सेना मेडल व कार्यक्रमाचे माहिती दिली. तसेच सेना दलाकडून वीरपिता, वीरपत्नी यांचा सत्कार करून कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले.
यावेळी मंडल अधिकारी रजनी चंदनशिवे, उपसरपंच रामजी घेवडे, निवृत्त कॅप्टन महादेव घुगरे, पो.पाटील विनया सावंत, ग्रा प सदस्य तुकाराम चौगुले, वर्षा चिमणे, धनश्री शिंदे, तेजस्विनी कोकितकर, राजश्री कमते, चंद्रशेखर पाटील, दशरथ भिकले, तलाठी युवराज सरनोबत, शिवाजी कोकितकर, सुरज असवले यांच्यासह महागाव उंबरवाडी आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चौगुले तर आभार दशरथ भिकले यांनी मानले.