वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
अष्टे (चंदगड) येथील शहीद जवान पुंडलिक काकतीकर यांचे बलिदान आम्हा भारतीय नागरिकांना स्फूर्ती देणारे आहे. पुंडलिक सतत आम्हा सर्वांच्या हृदयात राहील त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, आजच्या तरुणांनी व्यवसनाच्या मागे न लागता एक आदर्श देशसेवक बनण्यासाठी प्रयत्न करावे, असे मौलिक विचार कंग्राळी बी. के. ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष गजानन पाटील यांनी हुतात्मा जवान पुंडलिक काकतीकर यांच्या 19 व्या स्मृतिदिनानिमित्त अष्टे येथे बोलताना मांडले.
जम्मू काश्मीरमधील कारगील या भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गोळी लागून अष्टे गावचा सुपुत्र पुंडलिक लक्ष्मण काकतीकर हा शहीद होऊन आज 19 वर्षे झाली. त्याच्या स्मृतीदिनी गावामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
प्रशांत पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी युवकांनी वीर जवान अमर रहे, भारत माता की जय, हिंदुस्थान जिंदाबाद, जबतक सूरज चांद रहेगा, पुंडलिक तुम्हारा नाम रहेगा, अशा घोषणा देण्यात आल्या.
पुंडलिक यांच्या स्मारकाचे पूजन माजी उपाध्यक्ष व नूतन ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील यांनी केले. स्मारकाला ग्रा. पं. सदस्य नवनाथ पुजारी, उमेश पाटील, तानाजी पाटील, शहीद जवान यांचे बंधू शंकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक काजगार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. गजानन पाटील यांनी श्रीफळ वाढविले. यावेळी अनेक मान्यवरांच्या हस्ते श्रद्धांजली वाहिली.
यावेळी लक्ष्मण ना. काकतीकर, अशोक काजगार, बालेशी हुचेकट्टी, शंकर काकतीकर, गोपाळ लोहार, नागरिक व अनेक मान्यवर उपस्थित होते.