वार्ताहर / बागणी
शिगाव येथील शहीद वीर जवान रोमीत तानाजी चव्हाण यांचे कुटुंबियांना केंद्र व राज्य शासनाच्यावतीने मदत व शहीद जवानांच्या कुटुंबियाना देय असलेल्या इतर सुविधा लवकर देण्याबाबत मागणीवरून जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांचे उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल ढोले जि प सदस्य संभाजी कचरे व शिगावचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते उपस्थित होते. यावेळी सुरवातीस जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांना निवेदन देण्यात आले. व चव्हाण कुटुंबाला शासकीय मदत लवकर मिळावी अशी मागणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी या बैठकीत शहीद जवान यांच्या कुटूंबाला राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातुन देण्यात येणाऱ्या सर्व आर्थिक मदत व अन्य सुविधा, सवलती कोणत्या मिळणार आहेत. व कुटूंबाला कोणत्याही सोई सुविधा देण्यात येतात याची माहिती यावेळी त्यांनी सर्वांना दिली. जिल्हाधिकारी व जिल्हा सैनिक अधिकारी कर्नल ढोले यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांना सविस्तर चर्चा करून माहिती दिली व राष्ट्रवादी शिष्ठ मंडळला चव्हाण कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत लेखी माहीती देखील देण्यात आली.
ही मदत लवकरच शहीद कुटूंबाला देण्यात येणार आहे. शासकीय कागद पत्रांची पूर्तता सुरू आहे ती लवकरच पूर्ण होईल व सर्व मदत त्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांचे आभार मानले.