जगातील सर्वात मोठय़ा जहाजाचे बुकिंग सुरू
प्रवासी क्षमता 7 हजार, फॅमिली सुइटचे भाडे 27 लाख
जर तुम्ही क्रूज प्रवासाचे चाहते असाल तर जगातील सर्वात मोठय़ा जहाजाच्या पहिल्या प्रवाशांमध्ये सामील होऊ शकता. मार्च 2022 पासून शांघाय येथून रवाना होणाऱया क्रूज ‘वंडर ऑफ द सीज’च्या पहिल्या प्रवासासाठी बुकिंग सुरू झाले आहे. रॉयल कॅरेबियन इंटरनॅशनलने याची पहिली छायाचित्रे प्रसारित केली आहेत.
दोन हजारांहून अधिक लक्झरी रुम्स असलेल्या या जहाजावर 6,988 प्रवासी सामावू शकतात. याचे प्रतिव्यक्ती प्रवासभाडे दीड लाखापासून तीन लाख रुपयांपर्यंत आहे. तर 4 लोकांच्या फॅमिली सुइटसाठी सुमारे 27.5 लाख रुपये भरावे लागणार आहेत. यात ओपन एअर थिएटरसह सुमारे 2000 रोपे असलेले सेंट्रल पार्कही तयार करण्यात आले आहे.
क्रूज कंपनी रॉयल कॅरेबियन इंटरनॅशनलनुसार प्रवासी मार्च 2022 पासून नोव्हेंबर 2022 दरम्यान शांघाय ते जपानच्या पहिल्या राउंट ट्रिपवर जाऊ शकतील. 9 रात्री आणि 8 दिवसांच्या या प्रवासादरम्यान ही क्रूज टोकियो, माउंट फूजी, कुमामोटो, कागोशिमा, इशिगाकी आणि मियाजाकी यासारख्या बंदरांवरून जाणार आहे. याचबरोबर ही क्रूज आशियाच्या काही टॉप रेटेड ठिकाणांसाठीही प्रवास सुरू करणार आहे. यात दक्षिण कोरिया, व्हिएतनाम देखील सामील आहे. नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान नाताळ, नववर्ष आणि अन्य सुटी पाहता व्हिएतनामच्या चान मे, दक्षिण कोरियाच्या बुसान आणि जेजुसह तैपैईसाठीही बुकिंग केले जाऊ शकते.
10 मजली या जहाजावर 18 डेक आणि 2867 स्टेटरुम्स म्हणजेच आलिशान सुईट्स आहेत. याची लांबी 1188 फूट तर रुंदी 210 फूट आहे. तर वजन सुमारे 2.37 लाख टन आहे. यात स्वीमिंग पूल, स्पोर्ट्स झोन, जिम, बास्केटबॉल आणि व्हॉलिबॉल कोर्टसह मिनी गोल्फ कोर्स देखील आहे.