चीनचा दुटप्पीपणा : सीमावर्ती क्षेत्रामध्ये युद्धाभ्यासाचे आयोजन
वृत्तसंस्था/ बीजिंग
लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावादरम्यान चीन आणि भारत दोघेही सावध भूमिका बाळगून आहेत. सैन्यबळ जमा केल्यावर चीनने युद्धाभ्यासाच्या अंतर्गत लढाऊ विमानांच्या घिरटय़ा सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे चर्चेद्वारे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चीन दाखवू पाहत आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने प्रसारित केलेल्या चित्रफितीत चिनी सैनिक रणगाडय़ांसह पर्वतीय क्षेत्रात युद्धाभ्यास करत असल्याचे दिसून येते.
स्वतःच्या नेतृत्वादरम्यान निर्माण झालेली सहमती लागू करण्यासाठी दोन्ही देश तयार आहेत. वर्तमान तणाव द्विपक्षीय कराराच्या अंतर्गत दूर करण्यासाठी सैन्य पातळीवर दोन दिवसांपूर्वी दीर्घ बैठक झाली आहे. राजनयिक तसेच सैन्य माध्यमांद्वारे दोन्ही देश सीमेवरील सद्यस्थिती संबंधी संवाद साधत असल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी सांगितले आहे.
स्थिती नियंत्रणात
दोन्ही देश सीमेवर शांतता प्रस्थापित राखण्यासाठी काम करून चांगले वातावरण तयार करतील. स्थिती स्थिर असून नियंत्रणात आहे. दोन्ही देश संबंधित मुद्दे निकालात काढण्यासाठी विचारविनिमयास तयार असल्याचे हुआ यांनी म्हटले आहे. भारतीय विदेश मंत्रालयाने तणाव दूर करण्यासाठी द्विपक्षीय कराराच्या अंतर्गत राजनयिक आणि सैन्यपातळीवर दोन्ही देश चर्चा सुरू करण्यावर सहमत असल्याचे नमूद केले होते. भारताच्या या भूमिकेनंतरच चीनची ही टिप्पणी समोर आली आहे. उच्चस्तरीय सैन्याधिकाऱयांमधील चर्चेत पूर्व लडाखमधील तणावासंबंधी कुठलाच ठोस तोडगा निघालेला नाही. पेंगोंग त्सो, गलवान खोऱयासारख्या संवेदनशील भागांमध्ये भारत सज्ज असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले आहे.
चिनी हेलिकॉप्टरच्या घिरटय़ा
दोन्ही देशांच्या सैन्याधिकाऱयांमधील चर्चेच्या दोन दिवसांनी म्हणजेच सोमवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक चिनी हेलिकॉप्टर दिसून आले आहे. मागील 7-8 दिवसांमध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वायुतळावरील हालचाली वाढल्या आहेत. चीनची हेलिकॉप्टर्स सातत्याने दिसून येत आहेत. सीमेनजीक तैनात चिनी सैनिकांना रसद पुरविण्यासाठी ही हेलिकॉप्टर्स उड्डाण करत असावीत, असे सूत्रांनी सांगितले आहे. गलवान खोऱयातील भारतीय प्रकल्पाच्या ठिकाणी यापूर्वी हेलिकॉप्टर दिसून आले आहे.