बेळगाव
शहरातील शांततेला सुरुंग लावण्यासाठी टपून बसलेल्या कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या गुंडांनी पुन्हा एकदा गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला. तान्हाजी या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला विरोध दर्शवून कनसेच्या गुंडांनी थयथयाट केला. परंतु मराठी भाषिकांनी सदर चित्रपटाच्या
प्रदर्शनाबद्दल आपला आग्रह स्पष्ट केला. त्यानंतर पोलिस यंत्रणेनेदेखील सदर चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे कनसेचा थयथयाट फुसका बार ठरला. तसेच चित्रपटाचा फलक पुन्हा चित्रपटगृहावर झळकला.
मागील आठवडय़ात कनसेच्या महाभागांनी शहरातील शांततेला सुरुंग लावला होता. त्यामुळे सीमाभागातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त झाली. तसेच अशा गुंडांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस खात्याने कृतिशील पावले उचलण्याची गरज व्यक्त झाली. परंतु पुन्हा पुन्हा कुरापती काढण्याचे कारस्थान सुरू असल्याने मराठी भाषिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कॅम्पमधील ग्लोब चित्रपटगृहासमोर कनसेच्या गुंडांनी निदर्शने केली. तसेच हा चित्रपट मराठय़ांच्या इतिहासावर आधारित असल्यामुळे त्यावर बंदी घालावी, अशी मागणी केली. शौर्याच्या इतिहासाबाबत अशाप्रकारे हीनस्तरावर जावून गुंडगिरी करण्याच्या या प्रकारामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.