रोमन अब्रामोविच यांच्या चेहऱयावर दिसू लागला प्रभाव : दृष्टीवरही परिणाम
रशियन अब्जाधीश रोमन अब्रामोविच यांच्यावर विषप्रयोग झाल्याची चर्चा आहे. वॉल स्ट्रील जर्नलनुसार कथितपणे काही आठवडय़ांपूर्वी रोमन अब्रामोविच यांच्यावर युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये एका बैठकीनंतर विषप्रयोग करण्यात आला होता. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या रशियाच्या युद्धादरम्यान ते ‘शांतता प्रस्थापित करू पाहणारे’ म्हणून काम करत होते.
एक शिष्टमंडळ युक्रेनवर रशियाचा हल्ला संपुष्टात आणण्यासाठी मार्च महिन्याच्या प्रारंभी कीव्हमध्ये पोहोचले होते. या शिष्टमंडळात रशियन अब्जाधीश रोमन अब्रामोविच आणि युक्रेनचे खासदार रुस्तम उमेरोव्ह यांच्यासह दोन अन्य अधिकारी सामील होते. येथे झालेल्या बैठकीनंतर या लोकांमध्ये काही अजब लक्षणे दिसून आली होती.
दिसून आली अजब लक्षणे
बैठक संपल्यावर सर्वजण कीव्हमधील एका अपार्टमेंटमध्ये गेले होते. परंतु सकाळी उठल्यावर त्यांचे डोळे सुजलेले होते आणि शरीरात वेदना होत होत्या. तसेच त्यांच्या चेहऱयाची आणि हातांवरील त्वचा निघू लागली होती. रोमन यांना काही काळ दिसणे देखील थांबले होते. यानंतर त्यांना तुर्कस्तानच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रोमन अब्रामोविच आणि रुस्तम उमेरोव्ह यांच्या प्रकृतीत सुधारणा असून त्यांच्या जीवावरील धोका टळल्याचे सांगण्यात येत आहे. रसायनाचा अस्त्रासारखा वापरून करून विष देण्यात आल्याचे तपासकर्त्यांचे मानणे आहे. विष कमी प्रमाणात दिले गेल्याने जीवाला धोका झाला नाही. हा प्रकार केवळ भीती निर्माण करण्यासाठी केला गेल्याचे तज्ञांचे मानणे आहे.
चर्चा रोखण्याचा उद्देश
मॉस्कोतील नेतृत्वाने चर्चा रोखण्यासाठी रोमन, रुस्तम उमेराव्ह समवेत अन्य अधिकाऱयांवर विषप्रयोग केल्याचे काही अधिकाऱयांचे सांगणे आहे. रोमन अब्रामोविच हे ब्लादिमीर पुतीन सरकारमध्ये चुकोटका क्षेत्राचे गव्हर्नर राहिले आहेत. रोमन यांना पुतीन यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते. युक्रेन आणि रशियातील ज्यू समुदायांसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.