प्रतिनिधी /कुंकळ्ळी
फातर्पा येथील श्री शांतादुर्गा किटलकरीण संस्थानात नवीन विजयरथ बनवून घेण्यात आला असून या रथाचा संपूर्ण खर्च डिजीसोलचे मालक असलेले उद्योजक कमलाक्ष पांडुरंग नाईक यांनी उचलला आहे. शनिवारी विधिवत हा रथ देवीला अर्पण करण्यात आला. तसेच अन्य एक उद्योजक तथा एका राजकीय व्यक्तीने उत्सवमूर्ती अर्पण केली आहे. शिवाय म्हापसा येथील नवीन महाबळेश्वर नाईक यांनी नवीन पालखी व उत्सवमूर्ती आणि मडगावच्या सुमित सिंगल यांनी मुखवटा व तीन देवांच्या मूर्ती प्रदान केलेल्या असून उभयतांच्या स्वहस्ते शनिवारी त्या विधिपूर्वक देवीला अर्पण करण्यात आल्या.
यानिमित्त मंदिरात सकाळपासून झालेल्या धार्मिक विधींत पुरोहित आशुतोष पाध्ये यांच्या अधिपत्याखाली वेदशास्त्रसंपन्न गुरू शिवडेकर यांनी शास्त्रोक्त विधी केला. इतर ब्रह्मवृंदाची त्यांना साथ मिळाली. विजयरथ हा यंदाच्या वार्षिक जत्रोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे. याआधी सिंहरथ व महारथ हे दोन रथ देवीच्या भक्तांनी अर्पण केले आहेत व आता नवीन पालखीची भर पडली आहे. हल्ली मंदिराची सर्वंकष प्रगती झाली असून याकामी भक्तांकडून सढळहस्ते मदत झाली आहे. मंदिराकडे जाणाऱया रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण नुकतेच करण्यात आले असून उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या प्रयत्नांतून ते झाले आहे.
कुमठा येथील कारागीर देविदास शेट्टी व त्यांचे इतर सहकारी यांनी बरीच मेहनत घेऊन विजयरथ तयार केला आहे. रंगरंगोटीशिवाय हा रथ सुबक असून तितकेच कोरीवकाम व घोडेही लक्ष वेधून घेतात. तीन दिवसांपूर्वी रथाचे सुटे भाग ट्रकवर टाकून तो दुपारी बाळ्ळीत पोहोचला. त्यानंतर बँडवादनाच्या तालावर बाळ्ळी येथून तो श्री शांतादुर्गा किटलकरीण मंदिराच्या ठिकाणी नेण्यात आला. देवस्थानचे अध्यक्ष दिलीप उत्तम नाईक देसाई, चिटणीस विराज वेंकू राऊत देसाई, खजिनदार महेश नीळबा नाईक देसाई, मुखत्यार संजू पांडुरंग देसाई यांनी त्याचे स्वागत केले. अन्य महाजन, नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते.