प्रतिनिधी / कुंकळ्ळी
किटल-फातर्पा येथील श्री शांतादुर्गा किटलकरीण देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार 25 पासून सुरू झाला असून आज शनिवार 27 रोजी त्याची सांगता होणार आहे. दरम्यान, आज शनिवारी रात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देवस्थानला भेट देणार असून मुख्यमंत्री बनल्यानंतर या देवस्थानला त्यांची ही पहिलीच भेट आहे. यावेळी संस्थान समितीतर्फे मुख्यमंत्री सावंत तसेच उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे यंदा धार्मिक विधी तेवढे ठेवलेले असून सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. देवस्थानचे अध्यक्ष दिलीप देसाई, चिटणीस विराज राऊत देसाई, खजिनदार महेश देसाई, मुखत्यार संजू देसाई हे नवे मंडळ जत्रोत्सव यशस्वीपणे साजरा करण्यासाठी कार्यरत असून त्यांनी कोविडमुळे जत्रोत्सवासंबंधी विशेष खबरदारी घेतली आहे. उत्सवाच्या अंतर्गत गुरुवार 25 रोजी पहिल्या दिवशी सकाळी यजमानास प्रायश्चित विधी, गणपतीपूजन, प्रार्थना, श्री भूमिपुरुषास लघुरूद्र सेवा, नंतर श्रींची महापूजा, प्रसाद झाला, तर रात्रीs श्रींची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. दुसऱया दिवशी शुक्रवार 26 रोजी सकाळी नवचंडी वाचन, पूर्णाहुती, दुपारी श्रींची महापूजा, आरती वगैरे, तर रात्री श्रींची सिंहरथातून मिरवणूक, आरती, प्रसाद वगैरे झाले. आज शनिवार 27 रोजी सकाळी श्रींची महापूजा, आरती वगैरे, रात्री 11.30 वा. पालखी, शिबिकोत्सव व नंतर 12 वा. महारथातून मिरवणूक, तीर्थप्रसाद होऊन उत्सवाची सांगता होईल.