प्रतिनिधी/ कुंकळ्ळी
फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळळीकरीण संस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवाची शनिवारी पहाटे असंख्य भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या महारथाच्या शानदार मिरवणुकीने सांगता झाली. जत्रोत्सवाच्या काळात मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे, कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस, माजी खासदार व एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यानी भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. त्यांचे स्वागत संस्थान समितीने केले.
जत्रेनिमित्त मोठय़ा प्रमाणात भरणारी फेरी यंदा मर्यादित स्वरूपात झाल्याने थोडा परिणाम जाणवला. पारंपरिक खाज्यांचे मांड, फुले, केळी, नारळ व कुंकू विपेते, पारंपारिक लाकडी वस्तू यांची दालने तेवढी मांडण्यात आली. भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन नवस फेडण्याचे काम नेहमीप्रमाणे केले तसेच श्रींच्या रथाच्या मिरवणुकीत भाग घेऊन आनंद लुटला. जत्रेच्या काळात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला तसेच अग्निशामक दलाचे पथकही सज्ज राहिले.
सोमवारी सुरू झालेल्या जत्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी अभिषेक, इतर धार्मिक विधी, पालखी मिरवणूक, जागर आदी कार्यक्रम झाले. 19 रोजी महाभिषेक, इतर धार्मिक विधी, रात्री 10 वा. अंबारी रथातून मिरवणूक झाली. बुधवार 20 रोजी विविध धार्मिक विधी, महाभिषेक व जागर, व नंतर देवीची फुलांच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. गुरुवार 21 रोजी सकाळी धार्मिक विधी, महाभिषेक, तर रात्री श्रींची विजयरथातून मिरवणूक काढण्यात आली. शुक्रवार 22 रोजी सकाळी महाभिषेक, इतर धार्मिक विधी, रात्री जागर व इतर विधी झाले, तर शनिवार 23 रोजी पहाटे 6 वा. महारथातून मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, देवीला अर्पण केलेल्या मौल्यवान व इतर प्रकारच्या वस्तूंचा लिलाव आज रविवार 24 ते गुरुवार 28 पर्यंत होणार आहे.