प्रतिनिधी/ कुंकळ्ळी
बाळ्ळी येथील श्री शांतादुर्गा बाळ्ळीकरीण संस्थानचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार 23 पासून विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येत असून त्याची सांगता आज 27 रोजी होणार आहे. शिडियोत्सव हे या जत्रोत्सवाचे खास आकर्षण असते. त्याचा यावेळी असंख्य भाविकांनी आनंद लुटला.
शनिवारी झालेल्या शिडियोत्सवाच्या अंतर्गत सकाळी लांबलचक शिडीवर गडय़ाला उताणा बांधून ढोल-ताशांच्या तसेच तुतारीच्या गजरात चोहोबाजूंनी गरागरा फिरवले गेले. पाच फेरे झाल्यानंतर गडय़ाला खाली उतरविण्यात आले असता त्याच्याकडून कौल-प्रसाद घेण्याची परंपरा असून त्यासाठी यावेळी भाविकांनी एकच गर्दी केली. याशिवाय दिवजोत्सव 24 रोजी होऊन त्यात महिला मोठय़ा उत्साहाने सहभागी झाल्या.
जत्रोत्सवाच्या प्रारंभी बुधवार 23 रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी वांगडी अभिषेक व रात्री 10 वा. श्रींची विजयरथातून भव्य मिरवणूक व पालखी, कोकणी नाटक, गुरुवार 24 रोजी सकाळी 6 वा. दिवजोत्सव, रात्री 10 वा. श्रींची सिंहरथातून भव्य मिरवणूक व पालखी, नंतर वंटे हौशी नाटय़मंडळ, वंटे यांच्यातर्फे कोकणी नाटक, शुक्रवार 25 रोजी रात्री 10 वा. श्रींची महारथातून भव्य मिरवणूक, पालखी व नंतर श्री सोमनाथ हौशी नाटय़मंडळ, अण्णे यांच्यातर्फे ऑर्केस्ट्रा, तर शनिवार 26 रोजी सकाळी 8.30 वा. शिडियोत्सव-गडय़ोत्सव झाला. रात्री 8 वा. श्रींचे सर्व परिवार दैवते, घरवया फिरून वजेश्वर मंदिराकडे प्रस्थान झाले. आज रविवार 27 रोजी सकाळी ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळण्याचा कार्यक्रम, दुपारी महाआरती, प्रसाद व नंतर रात्री गवळखांब गाऱहाणे होऊन उत्सवाची सांगता होईल.
23 ते 25 पर्यत दुपारी व व रात्री भाविकांसाठी महाप्रसाद झाला. 3 एप्रिल रोजी देवीस अर्पण करण्यात आलेल्या विविध वस्तूंचा लिलाव सकाळी 11 वा. पुकारण्यात येणार आहे. जत्रोत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष नीलेश फळदेसाई, सचिव सुहास फळदेसाई, खजिनदार सुरेंद्र फळदेसाई व मुखत्यार महेश फळदेसाई यांनी विशेष परिश्रम घेतलेले आहेत.