प्रतिनिधी / बेळगाव
उद्यमबाग शांती फोमॅक प्रा. लि. या कंपनीला जर्मनीच्या झेडएफ कंपनीने उत्कृष्ट पुरवठादार म्हणून सन्मानित केले आहे. मशीन शॉप उत्पादनामध्ये गुणवत्ता राखून त्याची निर्यात केल्याबद्दल जर्मनीच्या झेडएफ कंपनीने त्यांना हा सन्मान दिला आहे.
शांती फोमॅक प्रा. लि. फौंड्री चालवते आणि अत्याधुनिक यंत्रांच्या मशीन शॉप तयार करते. येथे 600 कामगार काम करतात. त्यांच्या उत्पादनापैकी 40 टक्के उत्पादन युके, बेल्जीयम, जर्मनी, इटली, ब्राझिल या देशांना निर्यात केले जाते. झेडएफ उद्योग समुहाचे जर्मनी येथे मुख्य कार्यालय आहे. 41 देशांतील 266 संस्था यामध्ये सहभागी आहेत.
झेडएफ संस्था वाहन सुरक्षित, परिणामकारक आणि आरामदायी असावे यावर भर देते. आपला विस्तार वाढविताना संस्थेने मे 2019 पासून नोव्हेंबर 2020 पर्यंत कार्यतंत्र पुरवठा विकास कार्यक्रम सुरू केला होता. याअंतर्गत 10 पुरवठादारांची निवड करण्यात आली. त्यामध्ये शांती फोमॅक ही एक आहे. 18 महिन्यांच्या कठीण परिश्रमानंतर शांती फोमॅकला चॅम्पियन हा बहुमान बहाल करण्यात आला.
संस्थेचे संचालक कांतीलाल पोरवाल आणि चार्टर्ड अकाऊंटंट योगेश कुलकर्णी, सीए रोशन कायकरी यांच्या उपस्थितीत या उपक्रमांतील सदस्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी विनायक मेंडके, वेंकटेश मठद, प्रभाकर व कुलदीप खोत यांनी आपले अनुभवकथन केले. गिरीश जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सरव्यवस्थापक गणपती भूजगौरव यांनी स्वागत केले. शांती फोमॅकचे व्यवस्थापकीय संचालक संतोष पोरवाल, उपाध्यक्ष शांतीलाल पोरवाल यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. सरव्यवस्थापक सतीश पोरवाल यांनी आभार मानले.