स्टोअर्सची संख्या 6 हजारपर्यंत वाढवणार
वृत्तसंस्था/ बेंगळूर
गेल्या 6 वर्षापासून भारतात आपली उपस्थिती दर्शवणाऱया शाओमी इंडियाला आता आपला विस्तार भारतात अधिक जोमाने करायचा आहे. कंपनीच्या स्मार्टफोन्सना मिळणारा भारतीय चाहत्यांचा वाढता प्रतिसाद पाहून येणाऱया काळात व्यवसाय वाढवण्यावर भर देण्याचे प्रयोजन शाओमी कंपनी करत आहे.
कंपनी भारतातील आपल्या एमआय स्टोअर्सची संख्या पुढील 2 वर्षाच्या कालावधीत 6 हजार इतकी करणार आहे. सध्याला ही संख्या 3 हजार इतकी आहे. त्याचप्रमाणे 15 हजार इतकी असणारी रिटेल टचपॉइंस्ची संख्या पुढील वर्षापर्यंत 30 हजारपर्यंत वाढवली जाणार आहे. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी कंपनी विस्ताराची योजना बनवत आहे. स्मार्टफोनसह इतर उत्पादने मिळावीत यादृष्टीने छोटी खेडी, गावपातळीवर पोहचण्याची योजना शाओमीने आखली आहे.
10 हजार जणांना रोजगार
ऑनलाइन रिटेलवर ग्राहकांचा प्रतिसाद तर मिळतोच पण ऑफलाइन स्टोअरच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न येणाऱया काळात जोमाने केला जाणार आहे. यायोगे त्या त्या भागातील स्थानिकांना जवळपास 10 हजार जणांना रोजगार मिळवून देण्याचा विचारही कंपनी करते आहे. दुसरीकडे एमआय स्टोअर ऑन व्हील्सची योजनाही कंपनीने राबवली आहे.