प्रतिनिधी / म्हापसा
शापोरा जेटीवर मासळी विक्री करणाऱया स्थानिक मच्छीमारांवर पोलिसांकडून वारंवार होणारा लाठीमार निषेधार्ह आहे. यापुढे सुरक्षित अंतर ठेवीत मासेविक्री करणाऱयांना पोलिसांनी सहकार्य करावे अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय बर्डे तसेच शापोरा बोट असोसिएशनचे अध्यक्ष बलभीम मालवणकर यांनी हणजूणचे पोलीस निरीक्षक सूरज गावस यांना सादर केले आहे.
बार्देशमधील बेती तसेच शापोरातील मच्छीमार जेटी तालुक्यातील मच्छीमार बांधवांसाठी उपयुक्त अशा जेटी आहेत. या भागातील बहुसंख्य ट्रॉलरमालक मासळी व्यवसायासाठी या जेटींचा मोठय़ा प्रमाणात उपयोग करतात. दिवसाकाठी अडीचशे ते तीनशेच्या आसपास मासळीवाहू ट्रॉलर्स याच जेटींचा उपयोग करीत मासळी व्यवसाय करीत असतात. दरम्यान शापोरातील जेटीवर सध्या पंचटावन्न ते पासष्टच्या आसपास मासळीवाहू ट्रॉलर्स मासळीची ने आण करीत असतात. त्यावर या भागातील शेकडो मच्छीमार कुटंबे अवलंबून आहेत. लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे येथील मासळी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला होता.
मध्यंतरी 14 एप्रिलनंतर लॉकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता लागू केल्यामुळे स्थानिक मच्छीमारांकडून चोटय़ा-मोठय़ा होडय़ा तसेच ठराविक अंतरापर्यंत ट्रॉलर्सचा वापर करूत मासळी व्यवसाय चालू ठेवण्याचा केलेला प्रयत्न स्थानिक पोलिसांनी जेटीवर अनपेक्षित लाठीहल्ला करून हाणून पाडला होता. स्थानिक मच्छीमारांवर लाठीहल्ला करणारे पोलीस नजीकच्या परिसरात उघडय़ावर वाहनांद्वारे खुलेआम मासळी विक्री करणाऱया परप्रांतीय मासळी विक्रेत्यांवर मेहरबान असल्याचा आरोप बलभीम मालवणकर यांनी पत्रकाद्वारे केला होता.
या पार्श्वभूमीवर संजय बर्डे तसेच बलभीम मालवणकर यांनी पोलीस निरीक्षक सूरज गावस यांची भेट घेत त्यांना स्थानिक मासळी विक्रेत्यांना सहकार्य करण्याचे निवेदन सादर केले.