अजमेर शरीफला गेल्यावर चोरट्य़ांचा डल्ला
सांगली प्रतिनिधी
शहरातील शामरावनगर येथे राहणाऱ्या मुजम्मील कय्यूम पठाण यांचे घर चोरट्य़ांनी फोडले असून त्यांच्या घरातील दोन लाख 84 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख एक लाख 19 हजार रूपये आणि कॅमेरा व गॅसची टाकी पळविण्यात आली आहे. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात पठाण यांनी चोरीची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शामरावनगर येथील 50 फुटी रोडवरील गादी कारखान्याजवळ मुज्जमील पठाण यांच्या मालकीचे घर आहे. ते काही दिवसांपूर्वी अजमेर येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी हे घर बंद होते. हे बंद घर चोरट्य़ांनी फोडून यातून सोन्याचे-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि कॅमेरा चोरून नेला आहे. पठाण हे अजमेर येथून आल्यावर त्यांना या चोरीची घटना समजली. त्यांनी याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद केली. पोलिसांनी या घरात येवून तपासणी केली तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज याशिवाय घरातील ठसे याचीही पाहणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी याच परिसरात एक घर फोडून त्याठिकाणाहून 50 हजाराचा ऐवज लंपास केला होता. या दोन्ही घरफोड्य़ा एकाच चोरट्य़ांनी केल्या आहेत का? याचीही तपासणी करण्यात येत आहे.