प्रतिनिधी/ बेळगाव
शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे दि. 10, 11 व 12 जानेवारी रोजी झूम मीटिंगद्वारे ‘काव्यावर्त’ ही तीन दिवशीय ऑनलाईन काव्यलेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत घेण्यात येईल. बेळगावचे साहित्यिक कृ. ब. निकुंब यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने ही कार्यशाळा त्यांना समर्पित असेल.
यामध्ये बेळगावमधील 25 वर्षांवरील महिलांना भाग घेता येईल. कार्यशाळा पूर्णतः मोफत आहे. दि. 10 रोजी दुपारी 4 वाजता प्रा. विजया धोपेश्वरकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होईल. यावेळी त्यांचे बीजभाषण होईल. विजया धोपेश्वरकर यांनी लिंगराज महाविद्यालयामध्ये मराठी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून काम केले. शारदोत्सव महिला सोसायटीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. सध्या त्या शारदोत्सव सोसायटीच्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या भाषणानंतर कवी श्रीराम पचिंदे ‘गझल लेखन’ या विषयावर बोलणार आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांना विविध पुरस्कार लाभले आहेत.