सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजन : महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
प्रतिनिधी / बेळगाव
शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे रविवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.30 वाजता किल्ला परिसर, बेळगाव येथे महिलांसाठी ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव हे ऐतिहासिक वारसा असलेले शहर आहे. पूर्वी वेणुग्राम अशी ओळख असलेल्या बेळगावात इतिहासकालीन शिल्पकला, संस्कृती, वास्तुशिल्प यांचे जतन केले आहे. या भुईकोट किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व, येथील शिल्पकला यांची महिलांना माहिती मिळावी या हेतूने शारदोत्सवच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हेरिटेज वॉकचे आयोजन केले होते. या वॉकमध्ये पन्नास महिलांनी सहभाग घेऊन हेरिटेज वॉकचा आनंद लुटला.
पदभ्रमंती करत संपूर्ण किल्याचे महत्त्व, त्यातील विविध ऐतिहासिक ठिकाणे, त्याचा इतिहास स्वाती जोग यांनी महिलांना सांगितले. 13 व्या शतकातील राजवटीच्या काळातील हा किल्ला, अंतर्भागात आदिलशहाच्या काळात बांधलेल्या अनेक इमारती, पूर्वी 108 जैन मंदिरे असलेल्या या ठिकाणी आज कमलबस्ती हे चालुक्मय शैलीतील जैन मंदिर व इतर दोन मंदिरे महिलांना पहायला मिळाली. दोन मशिदी, पाण्याची जुनी मोट, जुने शिलालेख अशा अनेक दुर्मीळ गोष्टी पहायला मिळाल्या. याबाबतची माहिती स्वाती जोग यांनी दिली.
थंड वातावरणातही प्रचंड उत्साहाने, मोठय़ा संख्येने महिलावर्ग उपस्थित होता. शारदोत्सव महिला सोसायटीच्या अध्यक्षा माधुरी शानभाग, प्रा. अरुणा नाईक, मेघा देशपांडे, निर्मला कळ्ळीमणी, संजीवनी खंडागळे, माधवी बापट, कीर्ती दोड्डण्णावर ही कार्यकारिणी तसेच संचालक मंडळातील अंजलीताई गाडगीळ, शोभा लोकूर, आशा कुलकर्णी, बिंबा नाडकर्णी उपस्थित होत्या. या सर्व महिलांसाठी चहापानाचे आयोजन अंजली नाडकर्णी यांनी केले. ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगण्यासाठी प्राजक्ता देशपांडे यांनीही मदत केली.