कागदपत्रे जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे यांच्याकडे सुपुर्द
प्रतिनिधी / मालवण:
राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ राज्यात अधिकृत शासनमान्य संघटना असून सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ ही त्यांची अधिकृत शासनमान्य शाखा आहे, अशा आशयाची कागदपत्रे जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे यांच्याकडे महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे, कार्याध्यक्ष विजय मागाडे, सचिव नंदकिशोर नाईक यांनी अन्य पदाधिकारी व सदस्यांसोबत सुपुर्द केली.
जिल्हय़ात गेली 37 वर्षे महासंघाचे कार्य इमाने-इतबारे सुरू आहे. राज्य शासनाचे मान्यता प्रमाणपत्र, आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र, राज्य संलग्नता प्रमाणपत्र व महासंघाचे निवेदन जिल्हा क्रीडाधिकारी यांना देण्यात आले. क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे सहकार्य गेल्या 37 वर्षांप्रमाणे याहीपुढे केले जाईल, याची हमी जिल्हा क्रीडाधिकारी यांना देताना अधिकृत महासंघाचेच सहकार्य घेण्यात यावे, असे निवेदन देण्यात आले.
महासंघाचे उपाध्यक्ष जयराम वायंगणकर, विजय मयेकर, खजिनदार शंकर पराडकर, मुख्याध्यापक जयसिंग पाटील, लक्ष्मण शिंदे, उमेश सुकी, कमलेश गोसावी, सुभाष सावंत, डी. डी. सावंत, संजय परब, उत्तम मळगावकर, दशरथ काळे, अजय सावंत, विश्वनाथ सावंत, सुदिन पेडणेकर, महेश जाधव, विनोद चव्हाण, सुहास बांदेकर, प्रकाश पावरा, संतोष तावडे, महेश नाईक, सुनील परब, श्रीनाथ फणसेकर, प्रशांत देसाई, संदीप देसाई, गजानन सावंत, हनुमंत सावंत, अंकुश मिरकर, प्रशांत सावंत आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या सभागृहात झालेल्या सभेत अध्यक्ष अजय शिंदे यांनी राज्य महासंघाच्या 13 व 23 सप्टेंबरच्या ऑनलाईन सभेत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या क्रीडा समस्या राज्य महासंघातर्फे मंत्री महोदय, क्रीडा आयुक्त, संचालक, उपसंचालक यांच्यासमोर मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. ज्येष्ठ क्रीडाशिक्षक उमेश सुकी, विश्वनाथ सावंत, उत्तम मळगावकर यांनी विचार व्यक्त केले. स्वागत जयराम वायंगणकर, प्रास्ताविक नंदकिशोर नाईक, तर आभार विजय मयेकर यांनी मानले.