भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी आजपासून, विराटसेनेने फलंदाजीत व्यापक सुधारणा करण्याची आवश्यकता,
लंडन / वृत्तसंस्था
यजमान इंग्लंडविरुद्ध आजपासून (गुरुवार दि. 12) दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार असून शार्दुल ठाकुर दुखापतग्रस्त असल्याने भारतीय संघ अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला खेळवण्याची शक्यता आहे. लॉर्ड्सवर होणाऱया या लढतीत विराटसेनेला फलंदाजीत आणखी व्यापक सुधारणा घडवणे क्रमप्राप्त असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 3.30 पासून पहिल्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होणार आहे.
यापूर्वी, नॉटिंगहॅमवर संपन्न झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ उत्तम स्थितीत होता. मात्र, पहिल्या डावातील भारताची फलंदाजी बरीच निराशाजनक झाली. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांना फारशा धावा जमवता आल्या नाहीत, तेही चिंतेचे ठरले. यापैकी विराट व पुजारा मागील दोन वर्षांपासूनच सातत्याने खराब फॉर्ममध्ये असून मेलबर्नमध्ये झळकावलेल्या शतकाचा अपवाद वगळता रहाणेच्या फलंदाजीत सातत्य राहिलेले नाही. विराट व पुजारा फलंदाजीतील भक्कम आधारस्तंभ आहेत. पण, अर्धशतकाचे शतकात रुपांतर करण्यात देखील ते सातत्याने अपयशी ठरत आले आहेत.
शार्दुलची दुखापत चिंतेची
टीम कॉम्बिनेशनचा विचार करता शार्दुल ठाकुरला धोंडशिरेची दुखापत झाल्याने तळाच्या क्रमवारीत त्याचा पर्याय उपलब्ध नसेल, असे संकेत आहेत. अर्थात, शार्दुल पहिल्या सामन्यात फारशा धावा जमवू शकला नव्हता. शार्दुलला लॉर्ड्सवर सराव सत्रादरम्यान वेदना जाणवल्या. त्याला पहिल्या कसोटीदरम्यान दुखापत झाली का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
रविंद्र जडेजा तंदुरुस्त होऊन परतला असल्याने भारताने पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनला राखीव खेळाडूत बसवले. मात्र, शार्दुल खेळू शकणार नसल्याने तळाची फलंदाजी मजबूत करण्यासाठी कोहली अश्विनला पसंती देण्याची शक्यता चर्चेत आहे. इंग्लंडचा संघ 2018 प्रमाणे यंदाही येथे थोडी हिरवळ ठेवणार का, याचे औत्सुक्य असेल. 2018 मध्ये भारतीय संघाचा डाव दोन दिवसात दोनवेळा गडगडला होता आणि अष्टपैलू ख्रिस वोक्सने भेदक गोलंदाजी साकारली होती.
खेळपट्टी कोरडी, ठणठणीत असेल तर अश्विन व जडेजा या उभयतांनाही खेळवणे रास्त ठरु शकते. ही जोडी अशा परिस्थितीत इंग्लिश फलंदाजी लाईनअपला आपल्या वैविध्याच्या बळावर सातत्याने अडचणीत आणू शकते.
इंग्लिश संघासमोर अनंत आव्हाने
इंग्लंडची कसोटी क्रिकेटमधील नव्या पिढीत दर्जा नाही, हे पहिल्या कसोटीत दिसून आले. केवळ कर्णधार जो रुटच्या सामना वाचवून देणाऱया 21 व्या कसोटी शतकामुळेच इंग्लंडला नामुष्की टाळता आली. शिवाय, पाचव्या दिवशी पाऊस बरसला, ते इंग्लंडच्या पथ्यावरच पडले होते.
संभाव्य संघ
भारत ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रित बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.
इंग्लंड ः जो रुट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्राऊली, सॅम करण, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओलि पोप, ओलि रॉबिन्सन, डॉम सिबली, मार्क वूड, सकिब महमूद.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ ः दुपारी 3.30 पासून.
स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसनच्या उपलब्धतेबाबत अंतिम क्षणी निर्णय
इंग्लंडचा आघाडीचा, अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड सराव सत्रादरम्यान दुखापतग्रस्त झाला असून यामुळे तो या लढतीत खेळण्याची शक्यता कमी झाली आहे. तो उपलब्ध नसेल तर मार्क वूडला संधी दिली जाणे अपेक्षित आहे. जेम्स अँडरसन देखील मांडीच्या दुखापतीने त्रस्त असून तो सराव सत्रात सहभागी झाला नाही. अँडरसनबाबतीतही शेवटच्या क्षणी निर्णय होऊ शकेल. इंग्लंडने लँकेशायरचा सीमर सकिब महमूदला संघात पर्यायी खेळाडू म्हणून पाचारण केले असून फिरकीपटू डॉम बेसला राष्ट्रीय संघातून मुक्त केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डॉम बेस यॉर्कशायर संघात दाखल होणार आहे.
अव्वलस्थान आणखी भक्कम करण्यासाठी केएल राहुल सज्ज
मयांक अगरवाल सराव सत्रात दिसून आला, हे भारतासाठी उत्तम संकेत असले तरी केएल राहुल संधी मिळाल्यास आघाडीचे स्थान आणखी भक्कम करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असणार आहे. फलंदाजी लाईनअपमध्ये बदल होण्याची शक्यता कमी असली तरी अगरवालची तंदुरुस्ती पाहता केएल राहुलला मध्यफळीत खेळवण्याबाबत विचार होऊ शकतो. स्वतः राहुल देखील मध्यफळीत फलंदाजीला अधिक प्राधान्य देत आला आहे. केएल राहुलने यापूर्वी पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात 84 धावांची दमदार खेळी साकारली व दुसऱया डावातही 26 धावांचे योगदान दिले होते.
भारत व इंग्लिश संघाला प्रत्येकी 2 गुणांचा दंड, खेळाडूंवरही कारवाई
पहिल्या कसोटी सामन्यात संथ गतीने गोलंदाजीबद्दल इंग्लंड व भारतीय संघातील खेळाडूंना 40 टक्के मानधन कपातीचा दंड ठोठावला गेला असून याशिवाय आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दोन्ही संघांना प्रत्येकी 2 गुणांचा दंड जाहीर केला आहे. आयसीसी मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी या दुहेरी कारवाईची घोषणा केली.
थोडक्यात महत्त्वाचे
@इंग्लंडचा संघ मागील 100 वर्षांच्या इतिहासात घरच्या मैदानावर झालेल्या पहिल्या तीनपैकी एकही सामना न जिंकू शकण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2014 मध्ये देखील इंग्लंडसमोर अशी नामुष्की आली होती. त्यावेळी घरच्या मैदानावर हंगामातील पाचव्या सामन्यापर्यंत त्यांना विजयापासून दूर रहावे लागले होते.
@कसोटी क्रिकेटमध्ये ग्रॅहम गूचचा 8900 धावांचा विक्रम मागे टाकण्यासाठी इंग्लिश कर्णधार जो रुटला आता अवघ्या 14 धावांची आवश्यकता आहे. हा टप्पा पार केल्यानंतर इंग्लंडतर्फे सर्वाधिक कसोटी धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत रुट दुसऱया स्थानी झेपावेल. @ब्रॉड व अँडरसन यांच्यापैकी एकही जण खेळू शकला नाही तर 2007 नंतर घरच्या मैदानावर झालेल्या लढतींमध्ये यातील किमान एकाचा संघात समावेश नसण्याची ही केवळ दुसरी वेळ असणार आहे. यापूर्वी, 2012 मध्ये विंडीजविरुद्ध बर्मिंगहॅम कसोटीतच ब्रॉड व अँडरसन या दोघांनाही खेळता आले नव्हते