आम आदमी पक्षाचे आश्वासन : दिल्लीसाठी घोषणापत्राचे प्रकाशन
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या 4 दिवसांपूर्वी सत्तारुढ आम आदमी पक्षाने स्वतःचे घोषणापत्र सादर केले आहे. या घोषणापत्रात पक्षाने पुढील 5 वर्षांसाठीचा कार्यक्रम मांडला आहे. जनलोकपाल आणि स्वराज्य विधेयक मांडण्याचे आश्वासन आपने दिले आहे. घोषणापत्राद्वारे ‘आधुनिक दिल्ली’ निर्माण करण्यासाठी एकत्रितपणे काम करू, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी म्हटले आहे. दिल्ली सरकारकडून चालविल्या शाळांमध्ये आनंदी वृत्ती तसेच उद्योजकतेच्या प्रशिक्षणानंतर आता देशभक्तीचे धडे देण्याचे आश्वासन ‘आप’ने दिले आहे.
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीत प्रायोगिक प्रकल्पांतर्गत 24 तास सुरू राहणारी बाजारपेठ विकसित केली जाणार असल्याचे म्हटले आहे. दिल्लीला आर्थिक केंद्राचा दर्जा मिळवून देण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकली जातील. कौशल्याचा अभाव असलेल्या महिलांना विविध प्रकारचे रोजगार मिळवून दिले जातील, असे ते म्हणाले.
भोजपुरी ही दिल्लीचीही भाषा आहे. या भाषेला घटनेच्या आठव्या यादीत सामील करण्याची मागणी सिसोदियांनी केली आहे. 9 वीच्या विद्यार्थिनीला मोफत सायकल उपलब्ध केली जाणार आहे. नव्या स्वच्छता कर्मचाऱयांची नियुक्ती करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
भाजपने स्वतःचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करावा. भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराशी जाहीर चर्चा करण्याची इच्छा असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे. दिल्लीच्या जनतेने स्वतःचे मत वाया जाऊ देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हमी योजनेचे प्रमुख मुद्दे
1 दिल्लीच्या प्रत्येक मुलाला उत्तम शालेय शिक्षणाची हमी
2 राज्याच्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्यवान ठेवण्याची हमी
3 प्रत्येक नागरिकाला शुद्ध पेयजल मिळण्याची हमी
4 घराघरांत 24 तास पाणी पुरवठय़ाची हमी
5 24 तास अन् 200 युनिट मोफत वीज
6 प्रदूषणाची पातळी एक-तृतीयांशवर आणणार
7 स्वच्छ यमुना नदीसाठी वेगाने काम करण्याची हमी
8 महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, मार्शलचा अवलंब होणार
9 अवैध वस्त्यांना नियमित करण्याची हमी