शिक्षण मंडळातर्फे सर्व शाळांना परिपत्रक जारी
प्रतिनिधी / पणजी
कोरोनाचे संकट आणि इतर सर्व संबधितांशी चर्चा केल्यानंतर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याचे परिपत्रक गोवा माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काढले असून ते सर्व शाळांना पाठवले आहे. 13 मे ते 4 जून 2021 या कालावधीत होणारी दहावीची परीक्षा रद्द झाली आहे. दहावीचा निकाल शाळेतील अंतर्गत परीक्षांवरून तयार करण्यात येणार असून त्याची माहिती लवकरच जनतेला दिली जाणार आहे.
अनुत्तीर्ण झालेल्या आणि पुनर्नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटी देऊन पुढील अकरावीत प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. खासगी नोंदणी केलेल्या दहावी विद्यार्थांकरीता बोर्डाची परीक्षा घेण्यात येणार असून त्या दोन्ही परीक्षा आगाऊ जाहीर केल्या जातील, असे परिपत्रकातून बोर्डाने कळविले आहे. दहावी परीक्षेसाठी नोदंणी केलेल्या आयटीआय विद्यार्थ्यांनाही परीक्षा द्यावी लागणार आहे.
अकरावी सायन्स, डिप्लोमासाठी प्रवेश परीक्षा
अकरावी सायन्स व डिप्लोमा प्रवेशासाठी वेगळी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून ती नंतर जाहीर होणार आहे. बारावीची परीक्षा यापूर्वीच पुढे ढकलण्यात आली असून त्याबाबत येत्या आठवडाभरात निर्णय होईल, असे गोवा बोर्डाच्या सचिव गोलाल्डिना मेंडिस यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दहावीची परीक्षा रद्द झाल्याची माहिती दिल्यानंतर दहावीच्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना पुढे ढकलण्यात येईल, असा गैरसमज काही विद्यार्थी तसेच पालकांनी करुन घेतल्याचे दिसून आले होते. या परित्रकामुळे आता सर्वांचे गैरसमज दूर होतील.