प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या संकटछायेत शैक्षणिक चित्रच पालटून गेले आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणालीमुळे सण, उत्सवानिमित्त शाळांना सुटय़ा पडण्याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना राहिलेली नाही. गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीची सरकारी सुटी शाळांना असते. मात्र गणेशोत्सव विविध शाळा स्तरावर मोठय़ा उपक्रमांनी साजरा केला जातो. यंदा सदर उपक्रमांना आणि शालेय स्तरावरील गणेशोत्सवाच्या उत्साहाला कोरोना संकटाचा ब्रेक लागला आहे. शिक्षकांकडूनच परंपरेनुसार गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यापासून नियमानुसार पाच-सात दिवसांचा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आल्याचे चित्र पहायला मिळाले.
शाळास्तरावर गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा शिक्षकांकडून जोपासली जाते. विद्यार्थ्यांच्या सहभागातून गणेशाची आरास, विविध कलाकृतींचे प्रदर्शन, गौरी आगमन सोहळा, विविध स्पर्धा तसेच परंपरेनुसार मनोभावे पूजा केली जाते. नृत्य, नाटय़ स्पर्धेच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेलदेखील यामुळे अनुभवायला मिळते. यामुळे गणेशोत्सवाचे दिवस शाळा स्तरावर मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात.
शिक्षकांकडून परंपरेनुसार गणेशोत्सव
यंदाचा शाळास्तरावरील गणेशोत्सव देखील विद्यार्थ्यांविना शिक्षकांकडूनच साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वर्गणीतून व विद्यार्थ्यांच्या सहभागातूनच उत्सव पार पडतो. मात्र कोरोनामुळे विद्यार्थ्यांविना मागील सहा महिन्यपासून शाळा बंदच आहेत. शिक्षकांनी मात्र शाळेची परंपरा विचारात घेऊन गणेशाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून पूजा केली. मात्र दरवर्षींचा गणेशोत्सवातील उत्साह, मुलामुलींचा प्रत्यक्ष सहभाग, आरती-प्रसादाचा आनंद हा कोरोनामध्ये लॉकडाऊन झाला असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केल्या.