सहावी ते आठवीच्या वर्गांना प्रारंभ : पहिल्या दिवशी 50 टक्के उपस्थिती
प्रतिनिधी /बेळगाव
शासनाने सोमवारपासून सहावी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार आदेशाचे पालन करत सोमवारपासून सहावी ते आठवीच्या ऑफलाईन वर्गांना प्रारंभ झाला. त्यामुळे बऱयाच दिवसांनंतर पुन्हा शाळांच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट पहायला मिळाला. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद पहायला मिळाला नाही. दरम्यान सकाळी शाळेच्या व्हरांडय़ात प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. खबरदारी म्हणून शाळांच्या वर्ग खोल्यांमध्येही सामाजिक अंतर ठेवून विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था केली होती.
कोरोना नियमांचे पालन व आवश्यक खबरदारी घेऊन शाळा प्रशासनाने सूचनांचे पालन करत शाळा भरविल्या. खबरदारी म्हणून शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक शाळेत सॅनिटायझेशन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना ऑफलाईन वर्गात उपस्थित राहण्याची सक्ती नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थितीही काही प्रमाणात कमी होती. शिवाय प्रत्येक शाळेत शौचालय व वर्गखोल्यांमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोनामुळे मागील काही महिन्यांपासून प्राथमिक शाळा बंद होत्या. मात्र सोमवारपासून पुन्हा एकदा शाळा पूर्ववत सुरू झाल्याने नेहमीप्रमाणे विद्यार्थी गणवेश घालून शाळेत दाखल झाले. दरम्यान विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी शिक्षकांकडून स्वागत करण्यात आले. सामाजिक अंतर राखत विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. कोरोना नियमांचे पालन करत शिक्षकांना अध्यापनाचे कार्य करावे लागले. गुप करून थांबू नये, शैक्षणिक साहित्याची देवाण-घेवाण करू नये, सामाजिक अंतर ठेवावे, सोबत गरम पाण्याची बाटली आणावी, अशा सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आल्या.
वर्ग खोल्या शाळा, परिसराचे निर्जंतुकीकरण
सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याने शनिवारी व रविवारी शाळांमधून खबरदारी म्हणून स्वच्छता, वर्गखोल्या व शाळा परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते.
शेवटच्या श्रावण सोमवारचा उपस्थितीवर परिणाम
दरवषी शेवटच्या सोमवारी शाळांना सुटी दिली जाते. मात्र यंदा कोरोनामुळे बंद असलेल्या 6 वी ते 8 वीच्या वर्गांना शेवटच्या सोमवारीच प्रारंभ झाल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम झाला. बऱयाच शाळांमधून विद्यार्थ्यांची 50 टक्के उपस्थिती पहायला मिळाली.