आमदार प्रा.जयंत आसगावकर यांची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी
आमदारकीच्या शपथविधीनंतर पहिल्या दिवशी कामकाजास प्रारंभ
प्रतिनिधी / वाकरे
महाराष्ट्र शासनाने दि.१ डिसेंबर रोजी काढलेला प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांबाबत फेरतपासणी करण्याचा आदेश रद्द करावा आणि या शाळांना अनुदान देण्याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी पुणे शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शपथविधी झाल्यानंतर पहिल्या दिवशी आमदार प्रा.आसगावकर यांनी आपल्या कामकाजास प्रारंभ केला आहे.
या निवेदनातील मजकूर असा की विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या यांच्या शासनाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार शाळांची तपासणी होऊन अनेक शाळा अनुदानास पात्र झालेल्या आहेत. मात्र, या परिस्थितीत दि. १ डिसेंबर रोजी शासनाने काढलेल्या आदेशानुसार या सर्व शाळा व तुकड्यांची फेर तपासणी करण्याबाबत काढलेला आदेश योग्य वाटत नाही. तरी सदर आदेश रद्द करावा व या सर्व शाळांना अनुदान देणेबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. त्यांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.
मुंबई: महाराष्ट्र शासनाने शाळा तपासणी आदेश रद्द करावा या मागणीचे निवेदन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देताना आमदार प्रा. जयंत आसगावकर, सोबत गृहराज्यमंत्री सतेज पाटील