सोशल मीडियावरील पोस्टवरही पोलिसांची नजर
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटकात सध्या सुरू असलेल्या हिजाब व भगवे शेले प्रकरणावरून पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी रविवारी विविध संघटनांच्या प्रमुखांची बैठक घेतली. सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत. शाळेत केवळ विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापन मंडळ वगळता अनावश्यकपणे इतरांनी फिरकू नये, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
रविवारी झालेल्या बैठकीत पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, गुन्हे तपास विभागाचे एसीपी एन. क्ही. बरमणी, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी आदी उपस्थित होते. या बैठकीत विविध संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱयांना बोलाविण्यात आले होते. हिजाब-भगवे शेले यावरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या शांततेला धक्का पोहोचू नये, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. शांततेला धक्का पोहोचेल असे कोणतेही कृत्य करू नये किंवा अशा कृत्यांना प्रोत्साहन देऊ नये. उच्च न्यायालय व राज्य सरकारने केलेल्या सूचनांचे पालन करावे, असा सल्ला पोलीस आयुक्तांनी दिला.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक संदेशांची देवाण-घेवाण करू नये. व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्रामसह सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकणाऱयांवर नजर ठेवण्यात येणार आहे. अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे बेळगावात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी सर्व संघटनांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱयांनी केले. संघटनांच्या पदाधिकाऱयांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.