श्रीकांत कुंभार/ सौंदलगा
येथील प्राथमिक मराठी शाळेमध्ये नुकतीच बालविज्ञान परिषद झाली. यावेळी शाळेतर्फे गावातील सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित केले होते. ज्या शाळेत आपण श्रीगणेशा सुरु केला, जगण्याचे बळ दिले त्याठिकाणी कर्तव्य म्हणून सर्वजण हजर होते. याप्रसंगी सरकारी शाळांचे अस्तित्व टिकविण्यासाठी ‘शाळेसाठी रोज एक रुपये’ ही कल्पना सुचली व ती अंमलातही आणली गेली.
या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी माजी विद्यार्थी व हालशुगरचे माजी उपाध्यक्ष एस. एस. ढवणे म्हणाले, आज अनेक विद्यार्थ्यांना सरकारी शाळांनी घडविले. मात्र काळाच्या युगात विविध समस्यांशी स्पर्धा करताना सरकारी शाळा मागे पडत आहेत. याला आर्थिक कारण प्रामुख्याने दिसून येते. यासाठी माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी रोज एक रुपये बाजूला ठेवल्यास शाळांमध्ये विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे सोयीचे ठरु शकते. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या शाळेसाठी रोज एक रुपया देवून शाळा सक्षम बनविली पाहिजे. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे गोळा झालेल्या वर्गणीतून शाळेला मोठय़ा प्रमाणात उभारी येईल. एक सकारात्मक दृष्टीने टाकलेले पाऊल कदाचित आपल्या शाळेसाठी विकासाचे मोठे दार उघडू शकते.
या आवाहनानंतर माजी विद्यार्थी, एपीएमसी सदस्य शशिकांत पाटील यांच्यासह 25 विद्यार्थ्यांनी त्याचदिवशी एक वर्षाची रक्कम शाळेला दिला. या चांगल्या उपक्रमाने सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. सर्वच गावातील सरकारी शाळेंच्या माजी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविल्यास सरकारी शाळांना पुन्हा एकदा सोनियाचे दिवस येण्यासाठी वेळ लागणार नाही.
प्रतिक्रिया
शिक्षण म्हणजे व्यक्तीचा मानवी बौद्धीक विकास घडवून आणणारे प्रभावी अस्त्र आहे. सर्वच क्षेत्रांप्रमाणे शिक्षण क्षेत्रातही मोठा बदल होत आहे. या स्पर्धेत आपली शाळापण टिकली पाहिजे. खासगी शाळेंचे पेव आता ग्रामीण भागातही पोहचले आहे. त्याचा परिणाम आपल्या सरकारी शाळांवर होत आहे. त्यामुळे माझी शाळा स्पर्धेत टिकून रहावी यासाठी प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे.
-एस.एस.ढवणे
.