शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक : राज्यात शाळा सुरू करण्याची जोरदार मागणी
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेची तीव्रता कमी होत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालये सुरू करण्याची जोरदार मागणी होत आहे. गत वर्षभरापासून बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत तज्ञांच्या समितीने राज्य सरकारकडे अहवाल सादर केला आहे. त्यानुसार शाळा सुरू करण्याबाबत प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार सोमवारी (आज) महत्त्वाची बैठक घेणार आहेत.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण केल्यानंतरच जुलै किंवा ऑगस्टमध्ये महाविद्यालये सुरू करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा उच्चशिक्षणमंत्री अश्वथ नारायण यांनी दिली आहे. मात्र, सध्यातरी पहिली ते दहावी शाळा सुरू करणार नसल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सांगितले आहे. पण, तरीही शाळा सुरू करण्यासाठी जोरदार मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी शिक्षणमंत्री सुरेशकुमार हे शिक्षण खात्याचे उच्चस्तरीय अधिकारी, सर्व जिल्हय़ांचे जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्याधिकारी, जि. पं. मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी व डीडीपीआय यांच्यासोबत सोमवारी बैठक घेणार आहेत.
वर्ग ऑनलाईन कि ऑफलाईन?
या बैठकीत देशातील इतर राज्यांनी शाळा सुरू करण्याबाबत हाती घेतलेल्या उपाययोजना तसेच राज्यात शाळा सुरू करावी की नाही, जर शाळा सुरू केल्या तर त्या ऑनलाईन की ऑफलाईन सुरू कराव्यात, याबाबत चर्चा होणार आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर कमी असलेल्या जिल्हय़ांमध्ये शाळा सुरू करणे शक्य आहे का? यावरही चर्चा होणार आहे. प्रारंभी विद्यागम योजना सुरू करून त्यानंतर शिफ्टनुसार वर्ग भरविणे योग्य आहे का? याबाबतही चर्चा होणार आहे.
सविस्तर चर्चा होणार
संसर्गाचे प्रमाण कमी असलेल्या उत्तरप्रदेश, दिल्ली, हरियाणा, बिहार, तामिळनाडू व तेलंगाना राज्यात 1 जुलैपासून शाळा सुरू करण्यासाठी तेथील सरकारने पुढाकार घेतला आहे. यानुसार राज्यातही शाळा सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. त्यामुळे राज्य सरकार शाळेबाबत कोणता निर्णय घेणार, याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.
आज दहावी परीक्षेची तारीख घोषित होणार?
राज्यात बारावी परीक्षा रद्द झाली असली तरी दहावी विद्यार्थ्यांच्या हितदृष्टीने दहावीची परीक्षा घेणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे दहावी परीक्षासंबंधी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी (आज) महत्त्वाची बैठक होणार आहे. अधिकाऱयांचे सल्ले आणि सूचना जाणून घेऊन शिक्षणमंत्री सोमवारीच दहावी परीक्षेची तारीख घोषित करण्याची शक्मयता आहे. यापूर्वीपासूनच माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी परीक्षेची तयारी करण्यात येत असून 6 हजार परीक्षा केंद्रांची स्थापना केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोना नियमांचे पालन करून सामाजिक अंतर ठेवण्यासाठी 6 फुटाला एका विद्यार्थी बसण्याची व्यवस्था केली जात आहे.