सर्व्हेक्षणातून विरोध उघड, मुख्याध्यापक संघटनेचा माहिती
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यातील बहुतेक सर्व पालक शिक्षक संघांनी (पीटीए) शाळा सुरू करण्यास विरोध दर्शविल्याने नजीकच्या काळात शाळा सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. कोरोनाचा संसर्ग अजूनही सुरूच असून रोज बळी पडत आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याशिवाय शाळा सुरू करू नका, असे गोवा मुख्याध्यापक संघटनेने सरकारला बजावले आहे. प्रथम मुलांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याचा सल्लाही संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
संघटनेचे अध्यक्ष मारीयान वालादारीस यांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यात 200 पेक्षा अधिक पालक शिक्षक संघ आहेत. त्यातील 196 संघांनी शाळा सुरू करण्यास स्पष्ट विरोध दर्शविला आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्यातील पालक शिक्षक संघांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी ही गोष्ट समोर आली आहे. शाळा सुरू केल्यास कोरोनाचा धोका आहेच शिवाय मुलांचा सॅनिटायझर वापरण्याचा खर्च वाढणार आहे. तो शाळांना परवडण्यासारखा नाही. शाळांना देखभाल अनुदानच मिळत नाही आणि गेली काही वर्षे तर त्या अनुदानाचा पत्ताच नसल्याचे श्री. वालादारीस यांनी सांगितले.
शाळा, शिक्षणापेक्षा आरोग्य महत्त्वाचे आहे. त्याचा विचार प्रथम झाला पाहिजे. शाळा सुरू झाल्यानंतर मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला तर त्याला जबाबदार कोणाला धारणार ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. पालक शिक्षक संघ तसेच शाळा अजुनही कोरोनाचा धोका पत्कारण्यास तयार नाहीत. हे या सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाल्याची माहिती त्यांनी दिली. आठवीपर्यंतच्या सर्व मुलांना पास करून पुढिल वर्गात प्रवेश देण्याची सूचना संघटनेतर्फे सरकारला करण्यात आली आहे.
दरम्यान, शिक्षण खात्यातर्फे याआधी विविध शिक्षण संघटना, पालक शिक्षक संघ व शिक्षणाशी संबंधित इतर सर्वांशी शाळा सुरू करण्याबाबत विचार विनिमय केला होता. त्यावेळी देखील शाळा सुरू करण्यास आक्षेप घेण्यात आला होता. कोरोनाचा संसर्ग व कोरोना बळी जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत शाळा सुरू करण्याचा विचार करू नका, असा संदेशच त्यातून सरकारपर्यत गेल्याचे समोर आले आहे.