शिक्षण खात्याच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष : पहिली ते आठवीचे वर्ग प्रत्यक्ष हजेरीत सुरु करण्याची कृती दलाची सूचना
प्रतिनिधी /पणजी
कोरोना जलद कृती दलाने येत्या सोमवार दि. 22 नोव्हेंबरपासून शाळा पहिली ते आठवी प्रत्यक्ष हजेरीत सुरु करण्याची शिफारस केली असून आता शिक्षण खात्याला त्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. कोरोनासाठी नेमण्यात आलेल्या तज्ञ डॉक्टर्सच्या समितीने शाळा चालू करण्याची सूचना यापूर्वीच करुन तसा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी दलाकडे पाठवला होता. दलाने त्यास मान्यता देऊन शाळा सुरु करण्यासाठी 22 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे. आता सरकार अर्थात शिक्षण खाते काय तो अंतिम निर्णय घेईल, असे दलाने सूचित केले आहे.
कोरोना महामारीमुळे गेल्या दीड ते दोन वर्षात शाळा बंद असून शिकवणी वर्ग फक्त ऑनलाईन पद्धतीनेच चालू आहेत. आता कोरोनाचे संक्रमण खूप कमी झाले असून नियंत्रणात आल्याने व ते पुन्हा वाढत नसल्याने गेल्या एक – दोन महिन्यापूर्वी नववी ते बारावी वर्ग प्रत्यक्ष हजेरीत सुरु करण्यात आले. त्या कालावधीत कोरोनाचे संक्रमण वाढले नाही म्हणून डॉक्टर्सच्या तज्ञ समितीने पहिले ते आठवीचे वर्ग सुरु करण्याची शिफारस जलद कृती दलाकडे केली होती. ती शिफारस दलाने मान्य केली असून 22 नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्यास हिरवाकंदील दर्शवला आहे.
तर सरकारला आदेश जारी करावा लागणार
आता शिक्षण खाते या शिफारशीवर काय निर्णय घेते याकडे शिक्षक – पालक वर्ग तसेच शालेय मुलांचे लक्ष लागून राहिलेले आहे. गेल्या दीड – दोन वर्षापासून मुलांनी शाळा पाहिलेली नाही. शिक्षकाना तसेच प्रत्यक्ष शिकवणी वर्ग अनुभवलेले नाहीत. घरात राहून मोबाईलवरच शिकवणीवर्ग चालू आहेत. शाळा जर खरोखरच 22 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आल्या तर हे ऑनलाईन शिकवणी वर्ग बंद होणार आहेत. सोमवारपासून जर शाळा सुरु होतील तर या दोन दिवसात सरकारला तसा आदेश जारी करावा लागणार आहे.
शनिवारी अंतिम निर्णय : मुख्यमंत्री
कृती दल समितीने येत्या सोमवार दि. 22 नोव्हेंबरपासून शाळा पहिली ते आठवी प्रत्यक्ष हजेरीत सुरु करण्याची शिफारस केली आहे. याप्रश्नी अधिक विद्यार्थी असलेल्या शाळांचा तपशीलवार आराखडा सादर करण्यास शिक्षण विभागाला आपण सांगितलेले आहे. पालक-शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन तसेच राजकीय पक्षांचा सल्ला घेऊन शाळा सुरू करण्याबाबत शनिवारी अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.