सोनिपत / वृत्तसंस्था
हरियाणाच्या सोनिपतमध्ये जीवनानंद पब्लिक स्कूलमध्ये गुरुवारी मोठा अपघात झाला. शाळेतील एका खोलीचे छत कोसळल्याने इयत्ता तिसरीतील 27 मुले अडकली होती. याचवेळी, तेथे काम करत असलेले 3 मजूरही ढिगाऱयाखाली दबल्याने जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, तेथून सात मुलांना गंभीर स्थितीत पीजीआय रोहतक येथे हलविण्यात आले. शाळा इमारतीची डागडुजी सुरू असताना अचानक छप्पर कोसळल्यामुळे वर्गात शिकणारी 27 मुले आणि टेरेसवर काम करणारे तीन मजूर जखमी झाले. अपघातानंतर शाळेत चेंगराचेंगरी झाली. जखमी मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एसडीएम सुरेंद्र दुहान, सिव्हिल सर्जन जयकिशोर आणि बाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी देवेंद्र कुमारही घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.