मेरडा येथील ग्रामपंचायत सदस्याचा अभिनव प्रयोग यशस्वी : विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ
वार्ताहर /नंदगड
मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी अनेक पालक मोठी धडपड करताना दिसतात. परिणामी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली आहे. ही पटसंख्या वाढविण्यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. असाच एक उपक्रम मेरडा येथील ग्रा. पं. सदस्य महाबळेश्वर पाटील यांनी ‘शाळेला जा रुपया कमवा’ ही योजना मेरडा व करजगी गावांतील विद्यार्थ्यांसाठी राबविली आहे. गेल्या सात वर्षांपासून ही योजना सुरू असून यावर्षी योजनेला सात वर्षे पूर्ण झाली आहेत.
मेरडा-करजगी मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी रोज एक रुपया देण्याचा उपक्रम महाबळेश्वर पाटील यांनी सुरू केला आहे. यासाठी त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनही दिले जात आहे.
या ठिकाणी जे विद्यार्थी दरवर्षी शिकतात, त्यांना दिवसाला एक रुपया गेल्या सात वर्षांपासून ते देत आहेत. सातव्या वर्षी त्या विद्यार्थ्यांची रक्कम नुकतीच त्यांनी विद्यार्थ्यांना सुपूर्द केली. त्यावेळी मेरडा व करजगी गावांतील शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, नागरिक उपस्थित होते. महाबळेश्वर पाटील यांनी स्वतःच्या खिशातून ही पदरमोड करीत असल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.