पिरवाडी हद्दीतील 7/12 शासनाचा तर अतिक्रमण करणाऱयांना खेड ग्रामपंचायतीच्या 8 अ उताऱयावर केला गोलमाल
प्रतिनिधी/ गोडोली
राष्ट्रीय महामार्गाच्या मालकीच्या जागेवर खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जागा परस्पर आपल्या नावावर करून काही बहाद्दरांनी मालमत्ता उभा केल्या आहेत. 7/12 हा कार्यकारी अभियंता व दळणवळण यांच्या नावे तर ग्रामपंचायतीच्या 8 अ उताऱयावर भोगवटदार म्हणून या बहाद्दरांची नावे आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता व दळणवळण यांना कसला ही थांगपत्ता लागू न देता ग्रामपंचायतीने कोणत्या ही कागदपत्रांची खातरजमा न करता त्यांची भोगवटदार म्हणून गुपचूप नोंद केल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. या अनाधिकृत मालमत्तेची खेड ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद असून हे 8 ते 10 बहाद्दर महिन्याला लाखो रूपयांची कमाई करत आहेत. त्यांच्या विरोधात सर्व पुरावे असून थेट न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी ‘तरूण भारत’ शी बोलताना सांगितले.
सातारा शहरालगत जाणाऱया राष्ट्रीय महामार्गालगत काही ठिकाणी रिकामी जागा आहे. यापैकी खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या पिरवाडीमधील गट नं. 13/14/अ ही जागा कार्यकारी अभियंता व दळणवळण खाते, सातारा यांचे नावे आहे. त्या मोकळ्या जागेवर काही गाव पुढाऱयांसह फुटकळ दादांनी विनापरवाना बांधकामे अनाधिकृतपणे उभी केलेली आहेत. याला जिल्हाधिकारी, नगररचना, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता व दळणवळण यांची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. मालक सदरी शासन असताना कोणती ही कागदपत्रे नसताना खेड ग्रामपंचायतीने थेट या बहाद्दरांची भोगवटादार म्हणून 8 अच्या दप्तरी नोंद करण्याचा पराक्रम करून दाखवला आहे.
गेल्या काही वर्षापूर्वी तत्कालीन ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामसेवकांनी केलेल्या या पराक्रमाने या बहाद्दरांनी शासकिय जागेत अतिक्रमण करून मोठी बांधकामे उभी केली आहेत. याला कोणत्या ही परवानगी नसल्याने अनाधिकृत असून ही भाडेतत्वावर देत महिनाला हे बहाद्दर लाखो रूपयांची कमाई करत असल्याचे उघड झाले आहे. या कमाईतून सावकारी, खंडणी घेत हेच बहाद्दर डबल कमाई करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरची जागा रिकामी करून ती शासकिय प्रयोजनासाठी वापरली गेली पाहिजे. या जागेवरील अतिक्रमण काढून जागा जिल्हाधिकाऱयांकडे दि. 30 एप्रिलपर्यंत हस्तांतरीत करण्याची मागणी सुशांत मोरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राष्ट्रीय महामार्ग विभागाला लेखी पत्र देवून केली आहे. अन्यथा दि. 1 मे महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाची इशारा दिला आहे.
25 वर्षापासून कमाईचा धंदा…
पिरवाडीमधील गट नं. 13/14/अ ही जागा कार्यकारी अभियंता व दळणवळण विभागाची असताना कोणत्याही परवानगीशिवाय केलेले अतिक्रमणाची नोंद खेड ग्रामपंचायतीकडे नाही. उलट अतिक्रमण करणाऱया बहाद्दरांनी सरपंच, सदस्यांशी संगणमत करून दप्तरात नोंदी करण्याचे धाडस कौतुकास्पद आहे. या नोंदी करताना तत्कालीन सरपंचाने आपले ही नाव यात नोंद करण्याचा डाव साधला आहे. गेली 20 ते 25 वर्षापासून रिकाम्या जागेवर सुरूवातीला टपऱया टाकल्या आणि हळूहळू पक्क्या इमारती उभ्या केल्या आहेत. या सर्व इमारती भाडेतत्वार देत आजमितीला हे बहाद्दर लाखो रूपयांची कमाई करत आहेत. कोणी या अतिक्रमण केल्या प्रकाराबद्दल बोलले तर दमबाजी केली जाते. यातील काही जणांनी सावकारी धंद्यात चांगलाच जम बसवला आहे. शासकिय जागेवर अनाधिकृत बांधकामे, ग्रामपंचायत दप्तरात नोंदी करणाऱया या बहाद्दरांनी वरकमाईचा कायम स्वरुपी धंद्यात जम बसवला आहे. हे सारे आता कायद्याच्या कचाटय़ात अडकविण्यासाठी न्यायालयातील याचिकेत परफेक्ट कार्यक्रम होईल, असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सांगितले.