आमदार वैभव नाईक यांची माहिती : शासकीय मेडिकल कॉलेजच्या हालचाली गतिमान : जिल्हा शल्य चिकित्सकांनी मागविले मार्गदर्शन
वार्ताहर / कणकवली:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. या महाविद्यालयाबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी आरोग्य सेवा संचालक व सहसंचालक, उपसंचालक यांच्याकडे पुढील बाबींची पूर्तता करण्यासाठी मार्गदर्शन मागविल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. जिल्हा रुग्णालयाच्या 27 एकर परिसरातच हे वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हय़ात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत सिंधुदुर्गात अस्तित्वात असलेल्या अनिवासी व निवासी इमारती, आवारातील मोकळी जागा, रुग्णालयातील विभाग व उपलब्ध यंत्रसामग्रीची पाहणी 27 सप्टेंबर 2016 रोजी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय समितीने केली होती. याबाबतचा अहवाल वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई येथील संचालक यांच्याकडे सादर करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी त्या अहवालाची प्रत जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आलेली नव्हती.
जिल्हा दौऱयात वेधले होते मुख्यमंत्र्यांचे लक्ष
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हय़ात विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. त्या बैठकीत खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करण्याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर जिल्हय़ात सुरू करण्यात आलेल्या आरटीपीसीआर लॅबच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हय़ातील वैद्यकीय महाविद्यालयाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक यांच्या सोबत व्हीडिओ कॉन्फरन्सने चर्चा करण्यात आली होती.
शिवसेनेच्या खासदार, आमदारांच्याही सूचना
यावेळी आमदार नाईक व राऊत यांनी वैद्यकीय महाविद्यालय तात्काळ सुरू करण्याबाबत आरोग्य विभागाकडून करण्यात येणारी कार्यवाही तातडीने करून घेण्याची जिल्हा रुग्णालय येथे भेट देऊन सूचना केली होती. जिल्हाधिकाऱयांनी आवश्यक ते पत्र सादर करण्याच्या सूचना शल्य चिकित्सकांना दिल्या होत्या.
आरोग्य उपसंचालकांचे मागविलेय मार्गदर्शन
त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सकांनी याबाबत आरोग्य सेवा संचालक (मुंबई), आरोग्य सेवा सहसंचालक रुग्णालये राज्यस्तर (मुंबई) यांच्यामार्फत उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ यांच्याकडे मार्गदर्शन मागविले आहे. आरोग्य सेवा संचालनालयाच्या अधिपत्त्याखाली 300 खाटांचे जिल्हा रुग्णालय कार्यरत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे येथील इमारती, जागा, चल-अचल मालमत्ता, अधिकारी, कर्मचारीवर्ग यांचे हस्तांतरण करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून करायच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्याची मागणी शल्य चिकित्सकांनी केल्याची माहिती नाईक यांनी दिली.