मेधा मराठे यांचे प्रतिपादन : वरेरकर नाटय़ संघातर्फे नाटय़ कार्यशाळेचे उद्घाटन
प्रतिनिधी / बेळगाव
साहित्य, संगीत, काव्य, नाटय़ यासह प्रत्येक शास्त्रामध्ये सतत नावीन्य येत असते. या शास्त्रांचा अभ्यास करताना किंवा सराव करताना कृत्रिमता टाळून आतल्या ऊर्जेला महत्त्व द्या, असा सल्ला लेखिका, दिग्दर्शिका व रंगकर्मी मेधा मराठे यांनी दिला.
वरेरकर नाटय़ संघातर्फे तीन दिवसांची नाटय़ कार्यशाळा गुरुवारपासून सुरू झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन केल्यानंतर मेधा मराठे बोलत होत्या. नटराज पूजनाने कार्यशाळेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी वरेरकर नाटय़ संघाचे सचिव जगदीश कुंटे व कार्यशाळेत प्रशिक्षण देणारे नीता कुलकर्णी व अनिरुद्ध ठुसे उपस्थित होते.
मेधा मराठे म्हणाल्या, आपण नेहमी विद्यार्थी आहोत ही भावना बाळगल्याने काही तरी नवीन सतत शिकू शकतो. नाटय़कर्मींना रंगमंदिरामध्ये अवकाश मिळतो. अभिनय, नेपथ्य विंगेत जाणे-येणे, संवाद, उच्चार, आवाज अशा टप्प्याटप्प्याने नाटय़शास्त्र शिकायला हवे. उत्स्फूर्त अभिनयासाठी काय करायचे नाही, हे प्रथम कलाकाराला कळायला हवे. तरच सादरीकरण उत्तम होते.
भारताच्या नाटय़शास्त्रामध्ये पाश्चिमात्य, रशियन असे अनेक प्रवाह मिसळले आहेत. त्या सर्वांचे मिळून भारतीय नाटय़शास्त्र तयार झाले आहे. नाटय़सृष्टी ही अशी आहे की जेथे शिक्षण घेतल्यानंतर चिंतन करून तुम्हाला काही निर्माण करावयाचे आहे, ते तुम्ही निश्चितच कराल. असे सांगून मेधा मराठे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. जगदीश कुंटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.