आज प्रदर्शित होणार चित्रपटाचा ट्रेलर
अभिनेता शाहिद कपूरचा चित्रपट ‘जर्सी’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. अभिनेत्याने सोमवारी चित्रपटाचे एक अधिकृत पोस्टर शेअर केले आहे. तसेच चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी संध्याकाळी झळकणार आहे.
या पोस्टरमध्ये अभिनेत्याचा चेहरा दिसत नसला तरीही तो क्रिकेटपटूच्या पोशाखात आणि हातात बॅट घेऊन चाहत्यांना अभिवादन करत असल्याचे आढळून येते. आम्ही 2 वर्षांपर्यंत ही भावना तुमच्यासोबत शेअर करण्याची प्रतीक्षा केली. ही कहाणी, टीम, व्यक्तिरेखा अत्यंत विशेष आहे. आम्ही हे तुम्हा सर्वांसोबत मोठय़ा पडद्यावर शेअर करणार आहोत असे शाहिदने म्हटले आहे.
मागील 2 वर्षांपासून चित्रपटासाठी आम्ही मोठा प्रवास केला आहे. प्रेक्षकांसाठी आम्ही कुठलीच तडजोड करू इच्छित नव्हतो असे चित्रपटाचा निर्माता अमन गिलकडून नमूद करण्यात आले.
गौतम तिन्ननुरी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार हा चित्रपट दोन वेगवेगळय़ा कहाणींवर आधारित आहे. यात शाहिद दोन लुक्समध्ये दिसून येईल. चित्रपटाची कहाणी एका अयशस्वी क्रिकेपटूच्या अवतीभोवती घुटमळणारी आहे.
जर्सी चित्रपट हा याच नावाच्या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटात शाहिदसोबत मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाद्वारे शाहिद सुमारे दोन वर्षांनी मोठय़ा पडद्यावर पुनरागमन करत आहे.