धर्मेंद्र-डिंपल कपाडिया देखील दिसणार
शाहिद कपूर आणि क्रीति सेनॉन एका रोबोटिक रोमँटिक कॉमेडी धाटणीच्या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. रोबोटवर प्रेम जडलेल्या एका व्यक्तीच्या अवतीभोवती या चित्रपटाची कहाणी घुटमळणारी आहे. या चित्रपटात क्रीति सेनॉन ही रोबोटची भूमिका साकारत असल्याचे समजते. या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले असून यात क्रीति तसेच शाहिदने भाग घेतला आहे.
धर्मेंद्र तसेच डिंपल कपाडिया देखील या चित्रपटात काम करत आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या राजस्थानात सुरू आहेत. पुढील टप्प्यातील चित्रिकरण दिल्ली किंवा चंदीगडमध्ये होणार आहे. धर्मेंद्र या चित्रपटात असल्याने युवा कलाकारांमध्ये मोठा उत्साह असल्याचे समजते.
धर्मेंद्र आणि डिंपल यांना यापूर्वी ‘दुश्मन देवता’ या चित्रपटात एकत्र पाहिले गेले होते. त्यापूर्वी त्यांनी ‘साजिश’ आणि ‘गंगा तेरे देश में’ यासारखे चित्रपट केले होते. याचदरम्यान शाहिद अन् क्रीति पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान यांनी केली आहे. विजान यांनी यापूर्वी ‘भेडिया’ हा चित्रपट निर्मिला होता, यात वरुण धवनसोबत क्रीति सेनॉन मुख्य भूमिकेत होती.
या चित्रपटाच्या व्यतिरिक्त शाहिद कपूर हा अनीस बाजमी यांच्या चित्रपटात दिसून येणार आहे. अली अब्बास जफरसोबतचा त्याचा चित्रपट ‘ब्लडी डॅडी’ पुढील वर्षी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.