शाहुवाडी प्रतिनिधी
कसत असलेल्या जमिनीची मागणी करण्यासाठी अनेक वेळा शासनदरबारी मागणी करून देखील दखल न घेतल्याबद्दल पणुद्रे ता. शाहूवाडी येथील सुनील कोंडीबा लोखंडे यांनी 1 एप्रिल रोजी तहसील कार्यालय शाहुवाडी समोर कुटुंबियासह आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिस आणि प्रशासनाच्या सतर्कतेने त्याला आत्मदहना पासून रोखले.
लोखंडे यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की गट नंबर 687 मधील दोन हेक्टर क्षेत्र माझे आजोबा पासून आज तिसरी पिढी ही आज पर्यंत कसत आहे. सदरची जमीन सरकारी आकारी पड आहे. माझे कुटुंब व पूर्वज हे अशिक्षित भूमिहीन कुटुंब आहे. ते फक्त ही जमीन कसून जगत आहेत. सदर जमिनीची पूर्वीपासून मागणी करून देखील माझी योग्य ती दखल घेतलेली नाही. सदर गटातील जमीन वाटप केलेले आहे, व ज्यांना वाटप करून दिली आहे ते माझ्या वहिवाटीतील जमिनीची मोजणी करून मला धमकी दाखवून जमिनीतून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहेत. जी जमीन मी कसून तयार केली आहे ती सातबारावरील नोंदीच्या आधारे हडप करण्याचा इरादा आहे. याबाबत मी शासन दरबारी माझी जमीन मला मिळावी या मागणीसाठी मी माझ्या कुटुंबियासह आत्मदहन करत आहे.
आत्मदहन करणार असल्याने तहसील आवारात प्रशासनाने सतर्कता घेतली होती. पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुनील लोखंडे यांनी तहसील आवारात चार चाकी गाडीत येऊन आपल्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले. आग लावणार एवढ्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ त्यापासून परावृत्त केले. घटनास्थळी पोलीस कर्मचारी अमर चव्हाण, मलकापूर अग्निशामक दलाचे विठ्ठल वारकरी, अमर पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी सचिन सुगंध, श्रीकांत कांबळे आदी उपस्थित होते