ऍड. सचिन तिरोडकर यांनी भरवले प्रदर्शन
प्रतिनिधी/ सातारा
शाहूनगर येथील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून रस्ते खड्डेमय झाले आहेत. या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी सातारा नगरपालिकेत वारंवार निवेदने देवून कोणतीच पावले उचलण्यात आलेली नाहीत. याच पार्श्वभूमीवर ऍड. सचिन तिरोडकर आणि समस्त शाहूनगरमधील रहिवाशांनी दि. 27 पासून पुढील आठ दिवस खड्डय़ांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. हे पाहण्यासाठी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्षा मनोज शेंडे, बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनाही निमंत्रण दिले आहे.
सिव्हिल हॉस्पिटल ते सदरबाझार या रस्त्यावरील खड्डे मोजा अन् बक्षिस मिळवा अशी स्पर्धा घेण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून येथील रस्त्याची दुरावस्था झाली असताना सातारा नगरपालिका मात्र कोणतीच पावले उचलत नाहीत. याच पार्श्वभूमीवर शाहूनगर या भागातील एसटी कॉलनी ते अजिंक्य बाजार चौक या रस्त्याची चाळण झाली आहे. एक फुटाचे खड्डे पडल्याने रहिवाशांचा प्रवास खड्डय़ातून होत आहे. शाहूनगर हा भाग त्रिशंकुमध्ये होता. तो हद्दवाढ झाल्याने नगरपालिकेच्या क्षेत्रात आला आहे. यामुळे ऍड. सचिन तिरोडकर आणि रहिवाशांनी खड्डे भरण्यासाठी तसेच रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली. याबाबत नगरपालिकेच्या नगराध्यक्षा माधवी कदम, बांधकाम सभापती सिद्धी पवार यांना चालू वर्षाच्या जानेवारी ते मार्च महिन्यात वारंवार निवेदन देण्यात आले. या निवेदनावर रस्ता दुरूस्तीचे आश्वासने देण्यात आली. मात्र प्रत्यक्ष कोणतीच पावले उचलण्यात आली नाहीत.
पालिकेच्या या नुसत्याच आश्वासनाचा विरोध करत आजपासून पुढील आठ दिवस शाहूनगर रस्त्यावरच जाहिर खड्डे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 वाजल्यापासून सुरू राहणार आहे. पुष्पगुच्छ अथवा आश्वासनरूपी भेटवस्तू आणू नये अशी विनंती ऍड. तिरोडकरांनी पत्रकांत केली आहे.
पालिकेच्या पदाधिकाऱयांनी पहाणी करावीच…
गेल्या अनेक वर्षापासून शाहूनगर मधील रस्त्यांची अवस्था बिकट बनली आहे. येथील रहिवाशांना खड्डय़ामुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्रिशंकु भाग आता पालिकेच्या हद्दीत गेला आहे. यामुळे पालिकेने येथील सोयी-सुविधांकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे पण तसे होत नाही. यामुळे हे प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनाचा मुख्य हेतूच असा आहे की, पालिकेच्या पदाधिकाऱयांनी या खड्डय़ांची पाहणी करावी आणि डांबरीकरण करावे.
ऍड. सचिन तिरोडकर, शाहूनगर