आज अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन,
प्रतिनिधी/ सातारा
दर पाच वर्षांनी अभ्यंगस्नान आणि लक्ष्मीपूजनाचा एकाच दिवशी योगायोग येतो. तो योगायोग 2021 मध्ये आलेला आहे. या दिवाळीचे पहिले अभ्यंगस्नान करण्यासाठी शाहुनगरवासिय सज्ज झाले असून गुरुवारी पहाटेच उठून मुहूर्तावर अभ्यंगस्नान करण्यासाठी व दिवाळीचे फराळावर ताव मारुन पहिला फटाका फोडण्यासाठी तयारी केलेली आहे. दरम्यान, लक्ष्मीपूजनाला नवी वस्तू घरात असावी याकरता साताऱयाच्या बाजारपेठेत खरेदीसाठी अक्षरशः झुंबड झाली होती. केरसुणी, झेंडूची फुले, कपडे त्याचबरोबर घरगुती वस्तूंच्या खरेदी करण्यासाठी प्रत्येक दुकानात गर्दी दिसत होती.
नरकचतुर्दशीच्या दिवशी पवित्र्य असे अभ्यंगस्नान केले जाते. त्याकरता दि. 4 रोजीच्या पहाटे मुहूर्तावर हे अभ्यंगस्नान करण्यासाठी चंदन, उठणे, सुंगधी तेल घेवून सातारकर तयार आहेत. प्रत्येक घराघरात या अभ्यंगस्नानाच्या दिवशी पहाटे उठून पहिली अंघोळ करुन घरासमोर पहिला फटाका फोडण्याच्या तयारीत सातारकर आहेत. त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाचीही तयारी सातारकरांनी आदल्या दिवशीच करुन ठेवली आहे. शहरातील सोने, चांदीच्या दुकानात, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, मोबाईल या दुकानात गर्दी पहायला मिळत होती.
केरसुणी खरेदीसाठी गर्दी
साताऱयात मोती चौक व पोवई नाक्यावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरोघरी लक्ष्मीपूजनाकरता केरसुणीचे पूजन करण्यात येते. त्याकरता खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. 60 ते 70 रुपयांना एक अशी विक्री होत होती.
अभ्यंगस्नानाचा पहाटे 5.49 ला
तर लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सायंकाळी 6.10 ते 8.00
दिवाळीच्या सणामध्ये अश्विन कृष्ण चतुर्दशीचा दिवस हा नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. दिवाळीच्या दिवसामध्ये पहिलं अभ्यंगस्नान हे नरक चतुर्दशीच्या पहाटे करण्याची पद्धत आहे. यंदा नरक चतुर्दशी 4 नोव्हेंबर दिवशी आहे. हिंदू पुराणकथा आणि रूढी-परंपरांच्या माहितीनुसार, अभ्यंग स्नानासाठी रात्रीच्या शेवटच्या प्रहरापासून अरूणोदय पर्यंत गौणकाल आहे. अरूणोदय ते चंद्रोदय हा मध्यमकाळ आहे तर चंद्रोदय ते सूर्योदय हा काल मुख्य काळ आहे. मग यंदा नरकचतुर्दशी दिवशी अभ्यंगस्नान मुहूर्त – चंद्रोदय – पहाटे 5 वाजून 49 तर सूर्योदय 6.40 त्यामुळे या वेळेदरम्यान केले जाऊ शकते. तर लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा सायंकाळी 6.10 ते रात्री 8 असा आहे. याच मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करावे, अशी माहिती शास्त्राr मठातून देण्यात आली.