बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शाहू चौकात विविध क्षेत्रातील मान्यावरची हजेरी : पुष्पहार, मेणबत्ती लावून केले नमन : महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
प्रतिनिधी / सातारा
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्याने शाहू चौक येथील आंबेडकर बाग येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. देशात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने हा तुटवडा भरून काढण्यात योगदान देत रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले. यावेळी तरूणासह, महिला-युवतींनी रक्तदान केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा 64 वा महापरिनिर्वाण दिन घरात राहून साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शाहू चौक येथील आंबेडकर बागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना नियमांचे पालन करण्यात आले. सकाळपासून गर्दी न करता, मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करण्यात आला. लहान मुले, महिला, जेष्ठ यांनी पांढऱया रंगाचे वस्त्र परिधान केले होते. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बाबासाहेब अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. मेणबत्ती पेटवून अभिवादन करण्यात येत होते. बागेत बाबासाहेबांवरील विविध गाणी लावण्यात आली होती. यामुळे परिसरातील संपूर्ण वातावरण भिममय झाले होते. तसेच बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तके, त्यांचे विचार संविधानाची प्रत अशी अनेक पुस्तकांचे स्टॉल उभे हेते. ही पुस्तके खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड, आप्पा तुपे, सचिन वायदंडे, आदित्य गायकवाड, वैभव गायकवाड, सिद्धार्थ खरात, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, गणेश भिसे, क्रांती थेटरचे अमर गायकवाड, गणेश दुबळे, राष्ट्रवादीचे नेते दिपक पवार, विविध संघटनेने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
रक्तदान शिबीराला उर्त्पुत प्रतिसाद
देशात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने हा तुटवडा भरून काढण्यासाठी महापरिनिर्वाह दिनाच्या औचित्याने सातारच्या समता सैनिक दल व सामुदायिक विकास आणि संशोधन व्यवस्थापन संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात रक्तदान करण्यासाठी तरूणांनी सकाळपासून रांग लावली होती. यावेळी महिला व युवतींनी रक्तदान केले.